Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीबंडखोरांचा संमिश्र पवित्रा; कुणाची माघार, कुणी ठाम

बंडखोरांचा संमिश्र पवित्रा; कुणाची माघार, कुणी ठाम

नाशिक जिल्ह्यात १५ जागांसाठी २०० उमेदवार

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शहर आणि जिल्ह्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे गणित बिघडवू शकणाऱ्या काही उमेदवारांनी माघार घेतली तर निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा इरादा स्पष्ट करणाऱ्या काही ताकदवान उमेदवारांनी अर्ज माघारीस नकार देत बंडखोरीचे निशाण फडकवले. यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होणार असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांसाठी दोनशे उमेदवार रिंगणात उरले आहेत.

जिल्ह्यात ३३७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील १३७ उमेदवारांनी सोमवारी रिंगणातून माघार घेतली. मालेगाव बाह्य मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर कळवण मतदार संघात सर्वात कमी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या येवला मतदारसंघात महायुतीचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे. या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे कुणाल दराडे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. सोमवारी त्यांनी माघार घेतल्याने भुजबळ आणि शिंदे यांच्यातील प्रमुख दुरंगी लढत स्पष्ट झाली.

नाशिक पश्चिममध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ.डी.एल. कराड यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने विद्यमान आमदार सीमा हिरे, उबाठा सेनेचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील या प्रमुख उमेदवारांमध्ये निवडणूक लढली जाईल. देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा यांनी महायुतीतर्फे अर्ज दाखल करत बंधू योगेश घोलप यांना आव्हान दिले होते. योगेश घोलप यांना उबाठा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. वडील बबनराव घोलप यांनी मुलीस माहेरचे आडनाव न लावण्याची कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर तनुजा यांनी भावुक होत आपली उमेदवारी मागे घेतली; मात्र आपण महायुतीचे काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात महायुतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना मैदानात उतरवले आहे.

दोन चुलत भावांमधील भाऊबंदकीच्या राजकारणाने लक्षवेधी ठरलेल्या चांदवड देवळा मतदार संघात विद्यमान आमदार राहुल आहेर व त्यांचे चुलत भाऊ केदा आहेर हे अखेरीस समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांना काँग्रेसचे शिरीष कोतवाल व प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर यांचे आव्हान राहील.

नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचा निर्धार तडीस नेण्यात अपयश आले. त्यांनी माघार घेतल्याने आता या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपच्या देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे वसंत गीते यांच्यात मुख्यत्वे सामना रंगेल. पाटील यांच्याबरोबरच मनसेचे अंकुश पवार, अपक्ष गुलजार कोकणी, हनीफ बशीर यांनीही माघार घेतली आहे. निफाड मतदार संघात महायुतीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर व मविआचे अनिल कदम यांच्यात मुख्य लढत होईल. येथे आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिक पूर्व मतदार संघात महायुतीचे राहुल ढिकले व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते यांच्या प्रमुख लढत रंगेल. मनसेचे प्रसाद सानप यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने तेही रिंगणात राहिले आहेत.

शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे व अपक्ष समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणाव प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव मतदार संघात चौरंगी लढत होण्याचे निश्चित झाले आहे.कांदे व भुजबळ यांच्यासह गणेश धात्रक व अपक्ष डॉ.रोहन बोरसे हे दोन अन्य उमेदवार आहेत.

मालेगाव मध्य मतदार संघात एमआयएमचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, काँग्रेसचे एजाज बेग,समाजवादी पार्टीच्या शान-ए- हिंद व अपक्ष आसिफ शेख हे चार प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांना शिवसेना उबाठाचे अद्वय हिरे, अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचे मुख्य आव्हान राहील.

मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते यावेळी एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंतही आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं जरांगे यांनी सांगितले. दरम्यान, आता निडणुकीत भाग घेतला नसला तरी मराठा समाजाने ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडावे, असे जाहीर केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -