मुंबई : मागील काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी मी निवडणूक लढणारचं अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांनी राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा दर्शवली. याबाबत पत्रकारांशी संवाद करून त्यांनी माहिती दिली व ते शिवतीर्थावर पोहोचले. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याने दरवाजातूनच सरवणकरांना माघारी परतावे लागले. त्यामुळे आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
त्याचे झाले असे की, सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असताना आपण राज ठाकरे यांना भेटून आपल्या विभागातील मतदारांच्या निवडणुकीचे गणित राज ठाकरे यांना सांगणार असल्याचे सांगितले. यावेळी पहिल्यांदाच माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते, मात्र सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. मला यावर आता काहीही बोलायचं नाही, तुम्हाला उभं राहिचं तर राहा. नसेल राहिचं तर राहू नका असं सांगत राज ठाकरे यांनी सदा सरवणकरांचा प्रस्ताव सपशेल नाकारला.
यावर प्रतिक्रिया देताना सदा सरवणकर यांनी म्हटलंय की, मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे हे भेटायलाच तयार नसल्यानं माझा नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. माहीम मतदारसंघातील स्थिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगताना, मी जरी माघार घेतली तरी अमित ठाकरे निवडून येतील अशी परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची देखील इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. त्यामुळे आता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय सदा सरवणकर यांनी घेतला आहे. त्यामुळे आता माहीममध्ये तिरंगी लढती होणार आहेत.