नवी दिल्ली : दिवाळीच्या आसपासच्या दिवसात फटक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत कायम बोलले जाते. पण सध्या दिल्लीने मात्र याबाबतचे सगळे विक्रम मोडले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, रविवारी दिल्लीची हवेची गुणवत्ता “अत्यंत खराब” श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली, या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ३८२ वर पोहोचला.
या श्रेणीमुळे दिल्लीतील हवेचा दर्जा आता अत्यंत खराबवरुन गंभीर स्थितीमध्ये पोहोचण्याच्या पातळीवर पोहोचला आहे. कचरा किंवा पेंढा जाळण्याचे प्रमाण कमी असूनही हवेने प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. याचा अर्थ दिल्लीच्या प्रदूषणावर बाकीचे घटकही प्रभाव निर्माण करत आहेत, हे दिसून येते.
वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामाची धूळ हे दिल्लीच्या प्रदूषणामध्ये मोठी भर टाकतात.यातील कण हवेत बराच काळ राहून मानवी श्वासोश्वासावर गंभीर परिणाम करतात. दिल्लीतील हवेची पाहणी करणाऱ्या ४० स्थानकांपैकी डझनहून अधिक स्थानकांनी रविवारपर्यंत ‘गंभीर’ श्रेणीत प्रवेश केला आहे. त्रासदायक एक्युआय पातळी नोंदवणाऱ्या प्रमुख स्थानांमध्ये आनंद विहार, अशोक विहार, बवाना, द्वारकामधील दोन्ही स्थानके, जहांगीरपुरी, मुंडका, नजफगढ, लाजपत नगर, पटपरगंज, विवेक विहार, रोहिणी, पंजाबी बाग आणि वजीरपूर यांचा समावेश आहे. स्थानिक प्रदूषणाचे स्रोत,प्रतिकूल हवामानशास्त्रीय परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणात उत्सर्जन यामुळे दिल्लीतील प्रदूषणात आणखी भर पडत आहे.
उत्तर भारतात विशेषत: दिल्ली परिसरात पीक जाळणे, वाहनांचे उत्सर्जन, कोळसा जाळणे, कचरा जाळणे आणि उष्णता आणि स्वयंपाकासाठी बायोमास जाळणे यापासून धुराचा सामना करत आहेत. उत्तर भारत आणि शेजारील पाकिस्तानमध्ये वार्षिक पीक जाळल्यामुळे दिल्लीत आपत्कालीन-स्तरीय हवेच्या गुणवत्तेचे दिवस नियमितपणे अनुभवले जातात. देशाच्या राजधानीत पीएम २.५ उत्सर्जनाच्या ४०% साठी वाहनांचे उत्सर्जन जबाबदार आहे. प्रत्युत्तर म्हणून दिल्लीत जुन्या वाहनांवर बंदी घालण्यात आली. २०१८ च्या उत्तरार्धात बंदी लागू झाल्यापासून रस्त्यावरील कारच्या संख्येत ३५% ने घट झाली आहे. तरीही प्रदुषणाचे प्रमाण रोखण्यास म्हणावेसे यश मिळत नाही, हे मान्य करायवास हवे.