राहाता : शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या १२ उमेदवारी अर्जांपैकी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे अखेरच्या दिवशी ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात एकूण ८ उमेदवार उरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांनी दिली.
शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी १५ व्यक्तींनी २५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये १२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे अंतिम दिवशी अखेर उमेदवार तुषार गणेश सदाफळ, ममता राजेंद्र पिपाडा, जनार्दन चंद्रभान घोगरे, सुदर्शन लक्ष्मण शितोळे या चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ८ उमेदवार शिल्लक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुती एक महाविकास आघाडी एक व अन्य अपक्ष सहा असे मिळून ८ उमेदवार विधानसभेकरिता आपले राजकीय भविष्य अजमविणार आहेत. अर्ज माघारीनतर निवडणुकीच्या रिंगणात आता महायुती कडून अर्थात भाजपचे उमेदवार म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाविकास आघाडीकडून अर्थात काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे, अपक्ष म्हणून डॉ राजेंद्र मदनलाल पिपाडा, रामनाथ भाऊसाहेब सदाफळ, रेश्मा अल्ताफ शेख, मयूर संजय मुर्तडक, राजू सादिक शेख व मोहम्मद इसहाक इब्राहिम शहा आदी उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.