भालचंद्र ठोंबरे
महाभारताचा नायक, पांडवांचा त्राता असलेल्या भगवान श्रीकृष्णाला गांधारीने दिलेल्या शापामळे कृष्णाच्या वंशातील बऱ्याच यादवांचा नाश झाला. महाभारताच्या युद्धात कौरवांचा पराभव होऊन सर्व शंभर कौरव मारले गेले व पांडव जिंकले. या पांडवांच्या विजयात पांडवांपेक्षाही जास्त वाटा श्रीकृष्णाचा होता. युद्ध समाप्तीनंतर एकदा सर्वजण एकत्र बसून युद्धासंबंधी व युद्धातील आपल्या विजयासंबंधी चर्चा करीत असताना सहाजिकच अर्जून व भीम यांच्यापैकी प्रत्येकालाच विजयात आपला वाटा जास्त आहे असे वाटू लागले. तेव्हा कृष्ण त्यांना म्हणाले ज्याने युद्ध त्रयस्तपणे पाहिले तो या बाबतीत जास्त सांगू शकेल. मग असा कोण आहे? अर्जुन व भीमाने विचारले. कृष्ण म्हणाले बार्बरीकचे जिवंत शिर. जे एका उंच टेकडीवर बसविलेले आहे. कृष्णाने हे सजीव करून बसविले होते. सर्वजण येथे गेले बार्बरीक याला कोणाचा पराक्रम जास्त वाटला असे विचारले असता, बार्बरीकचे शीर म्हणाले “सर्व योध्ये पराक्रमाने लढत होते, मात्र मला संपूर्ण रणांगणावर केवळ सुदर्शन चक्रच फिरताना दिसत होते.’’ थोडक्यात काय पांडवांचा विजय झाला व त्या दरम्यान ज्या ज्या घटना घडल्या त्या सर्वात व पांडवाच्या विजयात श्रीकृष्णाचा वाटा जास्त होता त्या सर्वांचा करता करविता भगवान
श्रीकृष्णच होते.
मात्र या कृष्णाच्या वंशातील जवळपास सर्व यादव कृष्णाला मिळालेल्या शापामुळे मरण पावले. युद्ध समाप्तीनंतर कृष्ण गांधारीचे सांत्वन करण्यासाठी गेले असता शोकमग्न गांधारी आपल्या पोरांच्या आठवणीने विलाप करू लागली व कृष्णाला म्हणाली “माझ्या मुलांच्या नाशाला तूच कारणीभूत आहेस असे म्हणून ज्याप्रमाणे माझी सर्व मुले मरण पावली त्याप्रमाणे तुझ्या वंशाचाही नाश होईल’’ असा कृष्णाला गांधारीने शाप दिला. युद्ध समाप्तीनंतर कृष्णासह कौरव पांडवाकडून लढलेले सर्व यादव मथुरेला परत आले. एके दिवशी दुर्वास ऋषी मथुरेला आले असता तरुण यादवांना त्यांची चेष्टा करण्याची लहर आली. त्यापैकी काहींनी कृष्ण जांबवंतीचा पुत्र सांब याला एका गरोदर स्त्रीचा वेश देऊन दुर्वासांना हिला काय होईल मुलगा की मुलगी? म्हणून त्यांची टवाळी केली. या गोष्टीचा दूर्वास ऋषिंना राग आला ते म्हणाले” अरे सांबा, आपल्यापेक्षा वयस्क व्यक्तीची अशी चेष्टा करणे बरे नव्हे. पण आता तुम्ही विचारलेच म्हणून सांगतो. तिला एक मुसळ होईल आणि या मुसळामुळे कृष्ण व बलराम वगळता तुमचा बहुसंख्येने सर्वनाश होईल. दुर्वासांच्या या शापयुक्त वाणीने सर्व भयभीत झाले. सांबाने वेश उतरविला असता त्याला पोटापाशी खरोखरीच एक लोखंडी मुसळ दिसले. सर्वजण कृष्ण बलरामाकडे गेले व सर्व वृत्तांत त्यांना कथन केले. तेव्हा ज्येष्ठ यादवांनी या मुसळाचे बारीक चूर्ण करून ते समुद्रात फेकून दिले. यापैकी बरेच कण पाण्याबरोबर वाहत किनाऱ्यावर आले व त्याचे गवतात रूपांतर झाले, तर या तुकड्यांपैकी एक तुकडा एका माशाने गिळला या माशाला एका जरा नामक पारध्याने पकडून कापले असता त्यातून हा लोखंडाचा तुकडा निघाला तो या जरा पारध्याने आपल्या बाणाला लावला. महायुद्धा दरम्यान कृतवर्माने रात्री झोपेत असलेल्या पांडव पुत्रांचा वध केल्याने सात्यकीने त्याची टिंगल केली, तर कृतवर्माने सात्यकीने हात तुटलेल्या व निशस्त्र बसून असलेल्या भुरिश्ववाचा शिरच्छेद केल्याबद्दल कृतवर्माने सात्यकीची टिंगल केली. तेव्हा सात्यकिने चिडून कृतवर्माचा शिरच्छेद केला. यामुळे त्यांच्यात आपसात यादवी झाली. या हाणामारी मुसळाच्या कणापासून उगवलेले गवत उपटून ते एकमेकाला मारू लागले. या घटनेनंतर काही काळाने बलरामाने स्वतःला पाण्यात विसर्जित केले. काही दिवसांनी वनात पायावर पाय ठेवून विश्रांती घेत असलेल्या कृष्णाच्या पायाला हरीण समजून जरा पारध्याने बाण मारला व त्यामुळे श्रीकृष्णाचे पृथ्वीवरील अवतार कार्य समाप्त झाले.
अशाप्रकारे गांधारीच्या शापामुळे कृष्णाच्या वंशातील बऱ्याच यादवांचा नाश झाला. भगवान श्रीकृष्णाच्या गमनानंतर अर्जूनाने कृष्णाचा पणतू वज्रनाभ व उर्वरीत स्त्री परूषांना द्वारकेवरून हस्तीनापूरला आणले. त्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली.