मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हा सामना रोमहर्षक वळणावर आला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या. एजाज पटेल ७वर नाबाद आहे. न्यूझीलंडकडे १४३ धावांची आघाडी आहे आणि त्यांचा केवळ एक विकेट बाकी आहे.
वानखेडेमध्ये फक्त एकदाच हे घडले
आता तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने एक विकेट लवकर काढला पाहिजे. यानंतर ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरतील. सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव २६३ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघाला २८ धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियासाठी चौथ्या डावात पाठलाग करणे सोपे नाही. वानखेडेमध्ये धावांचा पाठलाग करणे कठीण मानले जाते. या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकदा १०० पेक्षा अधिक आव्हान यशस्वीपणे गाठता आले आहे. ही कामगिरी २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेने केली होती. तेव्हा आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्ध १६३ धावांचे आव्हान सहा विकेट गमावत पूर्ण केले होते. म्हणजेच भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी २४ वर्षे जुना रेकॉर्ड मोडावा लागेल.