Monday, December 9, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणदेवगडचा सांगून बाजारात विकला जातोय कर्नाटकचा आंबा

देवगडचा सांगून बाजारात विकला जातोय कर्नाटकचा आंबा

व्यापा-यांकडून दरवर्षी केली जाते ग्राहकांची फसवणूक

मुंबई : आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारपेठेत आंबे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. काही व्यापारी देवगड हापूस सांगून कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री ही कर्नाटकच्या नावानेच झाली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. तो आंबा देवगडचा आहे असे दाखवून विकला जात आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे.

मार्च, एप्रिल आणि मे हा हापूस आंब्याचा मुख्य हंगाम असतानाही हिवाळ्यातच बाजारात कर्नाटक राज्यातील आंबे दाखल झाले आहेत. ऑक्टोबरमध्येच बाजारात दाखल झालेला हा बेमोसमी आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. निसर्ग नियमानुसार आंब्याच्या बहार वसंत ऋतूमध्ये मोहर येऊन होळीच्या सणानंतर आंब्याच्या कै-या पाहावयास मिळतात.मात्र, यावर्षी ऐन दस-यानंतर बाजारात आंबे पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे बदलत्या काळामुळे निसर्गही बदलला तर नाही ना.. असा प्रश्न आंबे पाहणा-यांना पडतो आहे.

उशिरा छाटणी केलेल्या झाडांना पोषक वातावरण मिळाल्याने ऑगस्टमध्येच मोहर येणास सुरुवात होते व ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फळे बाजारात येतात. आता चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हंगामी आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. मोहर येण्याच्या प्रक्रियेपासून फळ तयार होण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे ९० दिवसांचा कालावधी लागतो. सर्वसामान्यांना परवडेल असा आंबा मार्चअखेर अथवा एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीपर्यंत बाजारात दाखल होईल, असा अंदाज फळ लागवड केलेल्या बागायतदारांनी सांगितले.

कसा ओळखायचा देवगडचा हापूस?

ज्या नागरिकांना ओरिजनल हापूस आंबा खायचा आहे त्यांनी काळजीपूर्वक आंबा खरेदी करणे आवश्यक आह. देवगड हापूस आंब्याची झाडे ही जांभ्या खडकात लाल मातीमध्ये असतात. खारे वारे लागल्यामुळे व पोषक वातावरण लाभल्याने त्या आंब्याला विशिष्ट चव प्राप्त होते. काही जानकार नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड हापूस आंबा चिरल्यानंतर तो आतमध्ये केसरी रंगाचा आहे तर कर्नाटकी हापूस आंबा पिवळसर रंगाचा आहे. देवगड हापूस आंब्याची साल पातळ असते.

कर्नाटकी हापूस आंब्याची साल जाड असते. तसेच देवगड हापूस आंबा पिवळसर व त्यावर हिरव्या रंगाच्या छटा असतात. कर्नाटकी हापूस आंबा पूर्णपणे गडद पिवळ्या रंगाचा असतो. देवगड हापूस आंब्याच्या देठाजवळ थोडा खड्डा पडलेला असतो. देवगड हापूस आंबा त्याच्या विशिष्ट प्रकारच्या वासामुळे आपण ओळखू शकतो. अशा प्रकारे देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याचा गोडवा आणि चव कर्नाटकी हापूस पेक्षा सरस आहे. तरी कर्नाटकी आंब्याची देवगड आंबा म्हणून विक्री करणार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -