बालरंगभूमी परिषद, मुंबईतर्फे राज्यभर दिव्यांग कला महोत्सव
मेघना साने
बालरंगभूमी परिषद, मुंबई यांनी बालरंगभूमीच्या विकासासाठी जिल्हानिहाय कार्यकारिणी मंडळे स्थापन केली आहेत. मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के व कार्यवाह सुप्रसिद्ध बालनाट्य दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी मुलांच्या विकासासाठी या संस्थेचे उपक्रम आखले आहेत. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्व शाखांनी आपापल्या शहरात दिव्यांग महोत्सव करावा असे ठरले.या संमेलनात विशेष मुलांच्या शाळा व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून घ्यायचे होते. कर्णबधीर, मूकबधीर, दृष्टिहीन, स्वमग्न, मतिमंद, गतिमंद, शारीरिक किंवा बौद्धिकदृष्ट्या अपंग अशा सर्व प्रकारच्या विशेष मुलांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ द्यायचे ठरले. नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला अशा सर्व कला प्रकारांचा समावेश करायचे ठरले. आणि संमेलनाला नाव दिले ‘यहाँ के हम सिकंदर’!
ठाणे येथे विशेष मुलांचे संमेलन दिनांक १३ ऑक्टोबर रोजी झाले. त्याचप्रमाणे बीड येथे ५ ऑक्टोबरला, नंदुरबार येथे ८ ऑक्टोबरला, जळगाव येथे ९ ऑक्टोबरला, रत्नागिरी येथे १४ ऑक्टोबरला, सोलापूर येथे १५ ऑक्टोबरला, सांगली व कोल्हापूर येथे १६ ऑक्टोबरला, पुणे येथे १७ ऑक्टोबरला, कल्याण येथे १८ ऑक्टोबरला, मुंबईला १९ ऑक्टोबरला, अकोला व परभणी येथे २० ऑक्टोबरला, नाशिक येथे २१ ऑक्टोबरला, धुळे आणि संभाजीनगर येथे २२ ऑक्टोबरला, लातूर येथे २३ ऑक्टोबरला, नागपूर येथे २४ ऑक्टोबरला, तर नगर येथे २५ ऑक्टोबरला अशी संमेलने संपन्न झाली.
ठाणे येथील संमेलन आयोजनात माझा सक्रिय सहभाग होता. बालरंगभूमी परिषद, ठाणे शाखेचे अध्यक्ष मा. मिलिंद बल्लाळ (‘ठाणे वैभव’चे संपादक) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठाण्यातील कार्यकारिणीतील सदस्यांनी काम करणे सुरू केले. मिलिंद बल्लाळ आणि कार्यवाह अमोल आपटे यांनी प्रत्येकाला या संमेलनाची वेगवेगळी जबाबदारी वाटून दिली. त्यानुसार मी, सुचेता रेगे आणि नूतन बांदेकर यांनी विशेष मुलांच्या शाळांना संपर्क करण्याचे काम स्वीकारले. विशेष मुलांमध्ये, मतिमंद, विकलांग, दृष्टिहीन, कर्णबधीर, मूकबधीर, स्वमग्न, अशा सर्व प्रकारच्या मुलांच्या शाळा ठाणे आणि परिसरात होत्या अशी माहिती मिळाली. कधी नेटवरून, तर कधी ओळखीतून माहिती काढून ठाणे आणि परिसरातील सव्वीस शाळांशी संपर्क केला. अमोल आपटे आणि सुचिता रेगे हे संगणक कामात हुषार असल्याने आमच्या सर्व कामांचे व्यवस्थापन सुसूत्रतेने होत होते. सहभागी झालेल्या सर्व शाळांतील शिक्षकांनी आणि पालकांनी आम्हाला उत्तम सहकार्य केले.
संमेलनाचा दिवस उजाडला. एकूण सव्वीस शाळा / संस्थांनी या संमेलनात सहभाग घेतला होता. कार्यकारिणीतील राजेश जाधव यांनी कार्यक्रमासाठी हॉल सुसज्ज करून ठेवला होता. दिव्यांग मुलांसमवेत पालक आणि शिक्षकांनी हॉल भरून गेला होता. त्यांचा उत्साह ओसंडून जात होता. बालरंगभूमी परिषदेतर्फे १८ वर्षांखालील मुलांनाच व्यासपीठ दिले जाणार होते. वयाने मोठ्या अशा दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री व्हावी म्हणून हॉलबाहेरील व्हरांड्यात स्टॉल्स मांडले होते. पणत्या, आकाशकंदील, फराळ, पिशव्या, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, भाजणीची पीठे, विविध प्रकारची अत्तरे, अशा अनेक वस्तू तेथे मांडल्या होत्या. उपस्थितांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. दोन अंध व्यक्ती वांगणी येथून आल्या होत्या व त्यांनी दिवाळीच्या वस्तूंचा स्टॉल लावला होता. व्यासपीठावरील सादरीकरणात ‘आत्मन अकॅडेमी’ने एक सुंदर नाटक सादर केले. मग गायन, वादन, नृत्य अशी सादरीकरणे होत गेली. एका विद्यार्थ्याने ‘लुंगी डान्स’ करताना गोविंदाला फेल केले, तर एका अंध विद्यार्थिनीने ‘सांज ये गोकुळी’ या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. एका अंध विद्यार्थ्याने ट्रॅकवर गायलेले ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे, तर वन्स मोअर घेऊन गेले. काही रसिक श्रोत्यांनी तिथल्या तिथे या मुलांना रोख बक्षिसे दिली. तसेच चित्रकलेसाठी एक वेगळे दालन ठेवले होते. तेथे दिव्यांग मुले शांतपणे चित्रे काढत बसली होती. कार्यक्रमाच्या अखेरीस त्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांची चित्रे प्रेक्षकांना दाखविण्यात आली. ‘जव्हेरी ठाणावाला’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पथनाट्य सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाचे पाहुण्यांनी खास कौतुक केले.
विशेष मुलांच्या प्रगतीसाठी काम करणे फार आव्हानात्मक असते. शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या मानसिक बळाची ती कसोटीच असते. म्हणून ‘यहाँ के हम सिकंदर’ या संमेलनात या सर्व शाळांमधील आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. संमेलनात विशेष मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स या मुलांनी व त्यांच्या शिक्षकांनी दिवसभर सांभाळले होते. त्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कला सादरीकरण करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सविता चौधरी आणि प्रेरणा कदम या दोन शिक्षिकांनी सूत्रसंचालन उत्तम रीतीने करून कार्यक्रमास रंगत आणली. तसेच प्रा. मंदार टिल्लू यांनी कार्यक्रमाच्या दिवशी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून पंधरा स्वयंसेवक मदतीसाठी पाठवून दिले. त्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.या कला महोत्सवाला नीलम शिर्के, राजू तुलालवार या मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहित केले. बालरंगभूमीच्या मध्यवर्ती शाखेतर्फे नागसेन पेंढारकर आणि वैदेही चवरे हे सदस्य निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच चित्रकार विजयराज बोधनकर, उद्योगपती चंद्रशेखरन, कुवेगा स्टुडिओचे सुरजित गवई, प्रा. प्रदीप ढवळ, शिक्षणतज्ज्ञ मीरा कोरडे हेही मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.