प्रा. देवबा पाटील
थंडीचे दिवस सुरू झाले होते. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. “आई, आपल्या शरीरात थंडीने हुडहुडी का भरते? थंडीमुळे आपले शरीर का कुडकुडते?” जयश्रीने एकामागून एक दोन प्रश्न विचारले. “ मनुष्य हा समतापधर्मी प्राणी म्हणजे बाहेरच्या हवेचे तापमान कितीही कमी-जास्त झाले तरी ज्याच्या शरीराचे तापमान नेहमी एका ठरावीक मर्यादेत कायम राहते असा प्राणी आहे. शरीराच्या स्नायूंची हालचाल जितकी जास्त, जोराने व वेगाने होते तितकी जास्त प्रमाणात शरीरात उष्णता निर्माण होते. जेव्हा आपणांस एकदम थंडी वाजते तेव्हा आपल्या त्वचेचे तापमान खूप कमी होते. त्यामुळे आपल्या शरीराचे सारे स्नायू एकदम आकुंचित होतात व त्यांची हालचाल पाहिजे तेवढ्या जोराने व वेगाने होत नाही. त्यामुळे शरीरात आवश्यक तेवढी उष्णता निर्माण होत नाही. शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी मेंदू मज्जातंतंूद्वारे सर्व स्नायूंना हालचाल करण्याचे आदेश देतो व त्यांची अनैच्छिक हालचाल सुरू होते. अनैच्छिक म्हणजे आपल्या इच्छेचा ताबा नसलेली हालचाल. स्नायूंच्या या सूक्ष्म हालचालींमध्ये म्हणजे कंपनांमध्ये स्नायूंचे वेगाने आकुंचन-प्रसरण होते. त्यामुळे संपूर्ण शरीरभर कंप सुटतो व शरीरात हुडहुडी भरते आणि हातपाय कुडकुडल्यासारखे हलतात. याच कंपामुळे तोंडाच्या जबड्याचे स्नायूही हलू लागतात. त्यामुळे जबड्यांची वेगाने उघडझाप झाल्याने खालचे दात वरच्या दातांवर कडाकड आपटतात. या साऱ्या कुडकुडण्याच्या हालचालींमुळे शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते. कधीकधी अति तापामुळे किंवा भीतीमुळेसुद्धा अशीच हुडहुडी शरीरात भरते.” आईने सांगितले. “ थंडीमध्ये अंगावर काटे कसे येतात गं आई?” जयश्रीने प्रश्न केला.
आई म्हणाली, “अंगावर काटे येणे हीसुद्धा एक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. आता मी तुला थंडीच्या दिवसात अंगावर काटे कसे येतात ते सांगते. शरीरावर प्रत्येक केसाखाली सुक्ष्म स्नायू असतोच. थंडीने ज्यावेळी स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी केसाच्या मुळाशी असलेल्या स्नायूच्या एकदम आकुंचन पावण्यामुळे त्वचेवरील केस ओढले जातात व ताठ उभा राहतो. त्यालाच आपण अंगावर काटा येणे असे म्हणतो. कधी कधी भीतीमुळेही मेंदूकडून आलेल्या संदेशानुसार केसाला जोडलेले स्नायू आकुंचित होतात व अंगावर काटे उभे राहतात. तसेच आनंदात मेंदूतील ज्ञानतंतूंकडून आलेल्या संदेशानुसार केसांच्या मुळाशी असलेल्या स्नायूंच्या पेशी फुगतात. त्यामुळे केसांच्या मुळावर ताण पडतो व आडवे असलेले केस वर उचलले जातात म्हणजे उभे राहतात. त्यालाच अंगावर रोमांच येणे असे म्हणतात.” “ आई उन्हाळ्यात उष्णता खूप वाढते व हिवाळ्यात तापमान खूप कमी होते. मग आपल्या शरीराचे तापमान कायम कसे राखले जाते?” जयश्रीने विचारले.
“तू फारच योग्य प्रश्न विचारला बाळा.” आई सांगू लागली, “आपल्या शरीरामध्ये तापमान कायम नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्वयंचलित यंत्रणा असते. ही यंत्रणा आपल्या शरीराचे तापमान कायम राखते. आपल्या शरीराचे तापमान सरासरी ३७ अंश सेल्सिअस असते. आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने ते तेवढेच कायम राहणे जरुरीचे असते. जेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे तापमान खूप कमी होते तेव्हा आपल्या शरीराला कंप सुटतो म्हणजे शरीराच्या स्नायूंचे वेगाने आकुंचन व प्रसरण होते. आपले शरीर थरथर कापते म्हणजेच शरीरात हुडहुडी भरते. शरीराच्या थरथरण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे त्या थंड हवेत आपल्या शरीराचे तापमान योग्य तेवढे राखले जाते. याउलट ज्यावेळी वातावरणात उष्णता वाढते त्यावेळी आपल्याला खूप घाम येतो. बाहेरच्या हवेच्या झुळकीने या घामाची वाफ होते. घामाच्या बाष्पीभवनाच्या क्रियेत आपल्या शरीरातील उष्णता वापरली जाते. त्यामुळे आपले तापलेले शरीर थंड होते. अशा तहेने आपले शरीर सभोवतीच्या कमीजास्त तापमानाला सामोरे जाते.” “ उन्हाळ्यात आपल्या शरीराचा दाह का होतो आई?” जयश्रीने प्रश्न केला. “ उन्हाळ्यात वाहणारे वारेसुद्धा उष्ण असतात. ते आपल्या शरीराच्या संपर्कात आले की, आपल्या शरीराचे तापमान जास्त वाढवतात. तसे पाहता वारा आपल्या शरीरावरील घामाच्या बाष्पीभवनाचा वेग वाढवतो. पण येथे या उष्ण वाऱ्यांनी शरीरावरील घामाचे बाष्पीभवन करून शरीरातील काढून घेतलेल्या उष्णतेपेक्षा वाऱ्यामुळे मिळालेली उष्णता जास्त असते. त्यामुळे शरीराचे तापमान कमी न होता उलट वाढते. म्हणून उन्हाळ्यात आपल्या शरीराचा दाह होतो.” आईने सांगितले.“आई आता थंडी वाजते. आता बस करूया.” असे जयश्री बोलली व त्यांची चर्चा थांबली.