डॉ. अनुराधा कुलकर्णी
सर्व सणांपैकी दिवाळीला आपण, “दिवाळी सण मोठा। नाही आनंदाला तोटा” असे म्हणतो. कारण दिवाळीचा समय हा संपूर्ण वर्षभरात जरा फुरसतीचा, संपन्नतेचा तसेच सुखावह वातावरणाचा असतो, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती शेतातले पीक आलेले असते, त्याचा पैसाही मिळालेला असतो. म्हणजेच धनधान्य समृद्धी असते. शेती कामापासून जरा विसावा मिळालेला असतो. त्यामुळे आप्तस्वकीयांना भेटायला फुरसत मिळू शकते. पावसाची रिपरिप थांबलेली असते, उन्हाची अति काहिली वा थंडीची अति शिरशिरी नसते. म्हणजेच वातावरण सुखद असते. पूर्ण वर्षभरातला हा सुवर्णयोग साधून आलेले दिवाळीचे चार दिवस सर्वांसाठीच आनंदाचा, संपन्नतेचा, तेजाचा, प्रेमाचा अनुभव देणारे असतात. यावेळी कोणीही खायला-ल्यायला कमी करीत नाही. सर्वांचीच घरदारे प्रकाशाने न्हाऊन निघालेली असतात, अशावेळी जे स्वतःच तेजोमय व आनंदमय, प्रेममय आहेत, असे संत या दिवाळीला कसे अनुभवीत असतील?
श्री तुकारामांच्या शब्दांत सांगायचे म्हटले तर,
“आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदची अंग आनंदाचे ।।’’
अशी केवळ आनंदाची अनुभूती ते दिवाळीत घेत असतील का? जो देश, काल, वस्तू यांच्या मर्यादेत नाही, म्हणजेच जो एकाच वेळी सर्व देशी, सर्व वस्तूंमध्ये असतो, अशा भगवंताशी एकरूप झालेले संतही दिक्कालातीत झालेले असतात आणि म्हणूनच आपल्यासारखा दिवाळीचा आनंद त्यांना फक्त दिवाळीतच मिळतो, असे नाही, तर त्यांचे हृदय परमात्मप्राप्तीच्या विशुद्ध आनंदाने अखंड भरलेले असते. त्यांच्यासाठी काळानेच आपले तोंड काळे केलेले असते आणि आत्मज्ञानाचा दिव्य प्रकाश चिरंतन उजळलेला असतो. दिवाळी त्यांच्याकरिता नित्य असते.
नामदेव महाराज म्हणतात की,
काळ मृत्यू दोन्ही घालोनि पायांतळी। वाजलिया टाळी कीर्तनसंगे।।
नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा। भोगिजे अवलीळा संतसंगे ।।
परमात्म्याचा स्वरूपानंद संतसंगाने अखंड राहतो. म्हणूनच “साधुसंत येति घरा। तोचि दिवाळी दसरा” असे तुकोबा म्हणतात, त्यासाठी संतांनाही संतसंगतीची ओढ असते.
तुकोबांच्या पुढील सुप्रसिद्ध अभंगात दिवाळीचा मोठ्या जिव्हाळ्याचा उल्लेख आहे.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली। पाहतसे वाटुली पंढरीची ।। दिवाळीला माहेरहून कधी बोलावणे येईल, यासाठी आसुसलेल्या लेकीसारखी माझी गत झालीय, पंढरपूराहून पंढरीनाथाचा मला कधी निरोप येईल, अशी मी आतुरतेने वाट पाहतो आहे, असे तुकोबा म्हणतात. दिवाळीचा उल्लेख ज्ञानेश्वरमाउलीने ज्ञानाच्या तेजासाठी केला आहे,
सूर्ये अधिष्ठिली प्राची। जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची। दिवाळी करी ।। १२ ।। ज्ञा.अ. १५
ज्याप्रमाणे सुर्याने पूर्व दिशेचा अंगिकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे गुरुकृपा लाभलेल्या वक्त्याची वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते, असे ज्ञानदेव म्हणतात. या आनंदमय ज्ञानतेजाचे वर्णन अर्वाचीन संत श्रीरामचंद्र महाराज यरगट्टीकर पुढील प्रमाणे करतात, गुरूचे अंजन मी ल्याले। माझे मज दिसू आले ।। झगमग झगमग कोंदाटले । चहुकडे तेचि ।। दिवाळीत पणत्या लावताना एका पणतीतल्या उजळलेल्या ज्योतीने दुसऱ्या पणतीची ज्योत उजळली जाते. त्याप्रमाणे सद्गुरू आपले ज्ञान शिष्याकडे संक्रमित करतात. त्यामुळे अवर्णनीय तेज फाकते. अशी गुरुज्ञानज्योतीने आपली ज्ञानज्योत पेटल्याची प्रचिती केळकर महाराजांना आली. ते तेज आगळे वाचे न वर्णवे। अनुभवी पहावे गुरूकृपे ।।
ज्योत लावोनिया ज्योती पेटविली। दासालागी आली प्रचिती हे ।। श्रीगुलाबराय महाराजांच्या भक्ती तपश्चर्येने त्यांच्यावर ज्ञानेश्वर प्रसन्न झाले, बालांध असूनही त्यांच्या लोचनांना प्रकाशाचे दान लाभले ! त्यामुळे त्यांच्या दृष्टीने जगातील भेदभावाचा पूर्ण निरास झाला आणि त्यांच्या हृदयात ज्ञानेश्वरदीप निरंतर तेवत राहिला.
तोचि पै म्हणावा उवेला सुदिन। पावती लोचन प्रकाशाचे ।।
निवटिला भेद झाले एकरूप। ज्ञानेश्वरदीप हृदयात ।।
शब्दाने वर्णिता न येणारा हा संतांच्या दिवाळीचा दिव्य प्रकाश आहे. त्यांच्या सणावारातले पक्वान्नही आगळेवेगळे असतात. एवढेच नव्हे तर ते पक्वान्न ज्यात वाढले जातात ते ताट, ते ताट ज्यावर ठेवले जाते तो चौरंग हे सर्वच अलौकिक असते. ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे,
पृथ्वी आडणी आकाश हे ताट। अमृत घनवट आप तेज ।।
नित्य हें जेवितां तेज प्रकाशत। सर्वही गोमटी ब्रह्माद्वारे ।।
जेवणार भला जेउनियां धाला। योगि जो निवाला परमहंस ।।
पार्थिव देह ही आडणी आणि त्यातील हृदयाकाश, मूर्धी आकाश हे ताट होय. त्यात सतराव्या जीवन कलेचे आत्मतेजाने युक्त असे अमृत वाढले गेले. हे अमृत जो नित्य जेवतो, तो आत्मतेजाने उजळून निघतो. ब्रह्मरंध्राच्या द्वारे परमात्म्याशी योग साधून अंतर्बाह्य शुद्ध होतो अशा प्रकारचे जेवण जेवणारा धन्य होय. तो सर्व श्रेष्ठ परमहंस योगी आत्मतृप्त होतो. सर्वच संत देहभावाच्या संकुचित चौकटीतून सुटलेले असल्याने त्यांना अशी दिव्य अतींद्रिय अनुभूती येतच असते. संतांनी आपले तनमनधन विश्वंभर परमात्म्याला अर्पण केलेले असल्याने त्यांना तो परमात्माही आनंदाचे भरभरून दान देतो! भगवंताच्या या अपार देण्याने भारावलेले तुकोबा म्हणतात,
मागतियाचे दोनचि कर। अमित भांडार वातियाचे ।।
काय करू आता कासियात भरू। हा मज विचारू पढला देवा ।।
दान घेणाऱ्याचे दोनच हात आहेत तर दान देणाऱ्याला अनंत कर आहेत. त्याचे हे अमाप देणे मी कशात भरू, असा मला विचार पडला आहे! दिवाळीचे वर्णन नामयाची दासी जनाबाईने साध्यासोप्या पण जिव्हाळ्याचा सुरेख रंग भरलेल्या शब्दात केले आहे.
सण दिवाळीचा आला।
नामा राउळासी गेला ।।
हाती धरूनी देवासी ।
चला आमुच्या घरासी ।।
देव तेथुनी चालले ।
नामयाच्या घरी आले ।।
गोणाईने उटणे केले।
वामाशेटीने स्नान केले ।।
पदर काढिला माथ्याचा।
बाळ पुशिला नंदाचा ।।
हाती घेऊन आरती।
चक्रपाणी ओवाळती ।।
जेऊनिया तृप्त झाले ।
दासी जनीने विडे दिले ।।
देवाविना दुसरे काहीही न जाणणाऱ्या संतांची दिवाळी अशा रीतीने देवाच्या अनुभवानेच परिपूर्ण आहे !!