Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपहिली गाडी, बैलगाडी

पहिली गाडी, बैलगाडी

आज मनाच्या हळव्या कोपऱ्यात बालपणाबरोबरच बैलगाडी सापडली. आपल्या जगण्यात कोणत्या वळणावर कोणता कासरा ढिला सोडायचा आणि कोणता कासरा आवरायचा हे बैलगाडी चालवताना पहिल्यांदाच उमगलं याची जाणीव प्रकर्षाने झाली आणि मग काय बघता बघता आठवणी आणि लेखणी बरोबर धावायला लागल्या.

वैशाली पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणातील १९७० मधील एक समृद्ध गाव “अंत्री खेडेकर” लोकसंख्या जेमतेम १४०० च्या आसपास ढोर दवाखाना, मराठी पूर्व माध्यमिक शाळा आणि शाळेला लागूनच सरकारी आरोग्य केंद्र, तसेच ५ वी ते १० वी साठी नेहरू विद्यालय. त्या भागातील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी चौथीनंतर कुणी चालत, तर कुणी बैलगाडीने नेहरू विद्यालयात शिकण्यासाठी यायचे. बैलगाडी शाळेकडे आली म्हणजे आम्हा सर्वांची एक एक पाळी करून घ्यायला धांदळ उडायची. बैलगाडी आम्ही पहिल्यांदा कधी पाहिली हे लक्षात नाही, कारण गावची माती, नदी, झाडे आणि आमचे बालपण छान एकत्र गुंफलेले. बैलगाडी हा त्याचा अविभाज्य भाग. खूप आठवणी आहेत. पहिला पाऊस पडला की, शेतात बैलगाडीने जाण्याची वेगळीच मज्जा असायची, जाता-जाता मध्येच विहीर बघून जेवण करायचो. सशक्त बैलांची जोडी आणि बैलगाडी आमच्या गावच्या समृद्धीचा एक भाग. घरी ट्रॅक्टर एकच पण बैलगाड्या भरपूर. पहिली मोठी गाडी बैलगाडी शिकण्याचा योग आपोआपच आला. ही जबाबदारी उचलली तुकाराम तात्यांनी ते हाडाचे शिक्षक. ते आम्हाला सगळ्यात अगोदर सुताराकडे घेऊन गेले, तिकडे बैलगाडी बनवली जात होती. आमच्या खेळण्यातील लाकडी गाडे सुतार भाऊच बनवायचे. आमच्या गावात अठरा पगड जाती एकत्र राहायच्या. सुतार भाऊ म्हणाले, मी आणि लोहार जे लोखंडाचे काम करतात, आम्ही दोघे मिळून बनवतो बैलगाडी.

सांधणी धुरा या बैलगाडीला जोडलेल्या लाकडी बल्ल्या होत्या. धुरेवर एक लाकडी फळी होती त्यावर चालक बसतो. “ताई तुम्ही या गाडीच्या धुरकरी” असे ज्या वेळेस तात्या म्हणाले त्या वेळेस खुप अभिमान वाटला. एक थोडा वाकडा दांडा होता. त्याला हाड्या म्हणतात असे म्हणाले. त्याच्यामुळे बैलगाडी रिकामी झाल्यावर जमिनीपासून दोन ते अडीच फुट उंच स्थिरावते. त्यामुळे बैल जुंपतांना गाडी उचलतांना त्रास होत नाही. गाडीत बसण्यासाठी ४ फुट रूंद ६ फुट लांब असा लाकडी पाळणा सुतार भाऊ बनवत होते. पाळणा पडू नये म्हणून तनया होत्या. मग खुटले दाखवले खोडबाह्या पाळण्याच्या खालचा भाग. त्यांनी गाडीची चाके जोडली जातात. मग आरेपाटे, बुधल्या तसेच खिळ्या. गाडीची चाकं आखापासून निसटू देत नाही म्हणून आखाच्या टोकावर छीद्र पाडून त्यावर ठोकलेल्या दोन लोखंडी पट्ट्या त्यामुळे गाडीची चाके आखापासून निसटून पडू शकत नाहीत. त्याचा आधार घेऊनच ऊगीचच कोणी भांडण काढायला लागलं तर म्हणतात, “ऊगंच खिळ्या नका काढू”. बैलगाडी सोबत एक पोकळ केलेला वेळू असतो. त्यात वंगण भरलेलं असतं व त्यात एक कापड बांधलेली तार असते. अती आवश्यक बाब त्या तारेच्या सहाय्याने वेळूतलं वंगण चाकांमध्ये भरलं जातं. “गाड्या बरोबर नळ्याची जत्रा” ह्या म्हणीला जन्म देणारी संकल्पना मराठी भाषेला समृद्धी देऊन गेली. बैलगाडीचाच दुसरा प्रकार ‘छकडा’ जो सींगल सीटर असतो. सोलो सीटर आजच्या आयशर मोटरच्या बुलेट गाडी सारखा तो प्रकार खूप कमी लोकांकडे असायचा आणि तो श्रीमंतीचे लक्षण समजला जायचा. धुरकरी झाल्यामुळे बैलगाडीच्या प्रवासाचा थरार, फसणे, आख मोडणे, धाव सटकने (पडनं) सगळे अनुभवता आले. जमीनदार घराण्यात जन्माला आल्यामुळे खुप सारे बैल, गाई, म्हशी, कालवडी, बकऱ्या, कोंबड्या तसेच गावच्या पारावरच्या फार मोठ्या पिंपळाच्या झाडावरचे असंख्य पक्षी हे सगळे जण आमचे सवंगडी. आमचे सगळ्यांचे बालपण खूप श्रीमंत होते. खूप महागडी खेळणी किंवा कुठलेही तांत्रिक उपकरण याची कधीच गरज पडली नाही. शाळा सुटल्यावर पाठीवरचे दप्तर घरात सोडून सुसाट पळत सुटायचे, आमच्या अठरा पगड जातीच्या मित्र-मैत्रिणींना भेटायला. कबड्डी, लंगडी, खो-खो, लपाछपी, डाब-डुबली, अंड-फोडी, वीटी-दांडू, लगोरी, कोय-पुरी, एक नाही अनेक खेळ पण सगळे सांघिक. त्यामुळे विजय आणि पराजय पण सगळ्यांचाच. प्रत्येक जण समरसुन खेळायचा. अंधार पडण्याच्या थोडे आधी सर्व शेतकरी बैलगाडीतून गावात येत असत. मग काय ॠतूनुसार बोरे, कच्ची गाभुळलेली पिकलेली चिंच, चनबोरं, आंबे, पेरू, खिरण्या आणि ऊस असा मस्त रानमेवा घेऊन येणाऱ्या बैलगाडीत उड्या मारून चढणे, उतरणे, मागे धावणे असे बालीश उद्योग आम्ही करायचो.

सुट्टीच्या दिवशी ठरलेला खेळ म्हणजे सनभात. सगळी लेकरं मिळून स्वयंपाक करायचो, भात करपलेला, पोळी जळालेली, भाजीच्या चवीबद्दल न लिहिलेले बरे. पण जेवणाची चव मात्र लाजवाब. दहा दिवसांचे गणपती बाप्पा मग तीन दिवसांच्या महालक्ष्मी आणि त्यानंतर महिन्याभरासाठी यायच्या भुलाबाई त्याची मज्जाच काही और असायची. प्रत्येक घरचे भातके ओळखण्याची शर्यत पण सगळं कसं सोपं सोपं शेंगदाणे, गुळ, साखर, खडी साखर, रेवड्या, खारुडी, कुरडई, शिजलेले मुग मटकी, भुईमूगाच्या शेंगा सगळे कसे गावरान. त्यामुळे आमची वाढही गावरान. आमच्या गावात आधी शेतात जाण्यासाठी चिखलाच्या पांदण रस्त्याने गाडी चालवावी लागायची त्यामुळे गाडी वाहुन नेताना बैल निवडीला महत्व होते. चिखलात फसलेली गाडी बाहेर काढणारी बैलजोडी एखाद्या मातब्बर शेतकऱ्याकडेच असायची. फसलेली गाडी बाहेर काढताना ते बघतांना आम्हा बच्चे कंपनीसाठी खुप थरारक अनुभव असायचा. गाडी बाहेर काढणारे बैल त्या साठी बैल आणि चालक हे खुप शर्थीचे प्रयत्न करायचे आणि मग गौरवात वाढ व्हायची ती मालकाच्या शेतकरयांचाही ऊर भरून यायचा, नदीला पूर आलेला असतानाही आम्हाला बैलगाडी प्रवास सुरक्षित वाटायचा कारण धूरकरी आणि बैलजोडी. गाव छोटं असल्याने सगळी मंडळी ओळखीची प्रत्येकाबरोबर घरगुती संबंध जोपासनारी गावात जर एखाद्या वयोवृद्ध आजी किंवा आजोबाच्या शेवटच्या क्षणाला सगळं गाव रात्रभर जागं असायचं, तिथल्या जिवन शैलीमुळे हार्ट अ‍ॅटॅक, ऍक्सिडेंटच प्रमाण अगदीच नगण्य होतं. माणूस मनभरून जगायचा, घरडकं (शेवटचा श्वास) लागल्या वर पारावर कोण ना कोण जागं असायचं. आम्ही पण आमच्या वयाच्या त्या घरातल्या साथीदारांबरोबर जास्तीत जास्त वेळ आजी आजोबांबद्दलच्या गप्पा मारत बसायचो. मरणही तीथं एकटेपणाचे नसे. जन्माचं स्वागत मोठमोठे सोहळे करून नाही झालं पण आम्ही गावच्या मुली बाळंतीणीच्या घरी पाणी भरायचो. त्याला “हेल घालणे” असं म्हणत. जेणेकरून बाळंतिणीला थोडा तरी आराम मिळावा. ही सामाजिक प्रथा खुप पध्दतशीर पणे पाळली जायची. अशा आमच्या गावच्या सामाजिक रचनेत प्रामाणिक पणे सेवा देणारा बैल वारल्यानंतर सांगोपांग अंत्यविधी केला जायचा. कृतज्ञता म्हणून घरधन्यानं न जेवणं, त्याच्या साथीदार बैलाच्या डोळ्यातून घळाघळा वहानारं पाणी नकळत्या वयात आम्हाला बरंच काही शिकवून गेलं. मुका प्राणी आणि माणूस यांचं एकआगळं वेगळं जग जवळून बघता आलं.

आजीमाय बरोबर बाजुच्या खेड्याला रात्री तंबुच्या टॉकीज मध्ये संत सखुबाई, रुखमाई, संत ज्ञानेश्वर, झाशीची राणी असे सिनेमे बघायला जायचं म्हटलं रे म्हटलं की, बैलगाडीत सगळ्यात अगोदर कडबा टाकला जायचा, त्यावर गादी आणि नंतर आमची बसायची व्यवस्था, बरोबर गाडी चालवायला कोणी तरी मोठं माणूस असायचं, पण प्रत्येक जण “ताई येतांना तुम्ही चालवा परतीच्या प्रवासाला” लाडाने आणि विश्वासाने सांगायचे. परतीचा प्रवास अर्थातच रात्रीचा असायचा, कमीत कमी १२ च्या नंतरच आम्ही दोन्ही शो बघून घरी यायचो. रस्त्यावर लाईट नसायचे, पण चांदण्यांचा मंद प्रकाश, त्याचं बरोबर रसत्याच्या बाजूला झाडांवरती काजवे चमकायची, बैलांच्या गळ्यातील घांगरमाळांचा सुरेल आवाज, शुद्ध आणि थंड हवेची झुळूक त्याच बरोबर धुरकऱ्याच्या भुमिकेत असल्यामुळे स्वतः बद्दल वाटणारा अभिमान. रात्रीच्या या प्रवासात रसत्यावर कोणीही नसताना कधी भीती किंवा हुरहूर मनाला शिवलीच नाही, एवढं समृध्द आमचा बालपण आणि आमची बैल गाडी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -