Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजनातं-बाप-लेकीचं!

नातं-बाप-लेकीचं!

पल्लवी अष्टेकर

ऐश्वर्याचे आई-वडील दोघेही नोकरी करायचे. तिचे संगोपन लहानपणापासून तिच्या आजी-आजोबांनी केले. तिला त्यांनी कायम अतिसुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऐश्वर्या फारशी कोणात मिसळायची नाही. त्यांच्या सोसायटीतील मुले संध्याकाळी एकत्र जमून निरनिराळे खेळ खेळत. त्यांच्यातही ती सामील होत नसे. मग घरात अभ्यास उरकून मोबाईल, टीव्ही. पाहत राही. कधी-कधी ती तासनतास आपल्या खोलीत वेळ काढे. हळूहळू तिचा स्वभाव एकलकोंडा बनत चालला होता. शाळेतही तीच परिस्थिती. त्यामुळे शाळेतून वर्गशिक्षकांच्या सूचना येऊ लागल्या. ऐश्वर्याच्या वडिलांना ही बाब गंभीर वाटू लागली. तिच्या एकलकोंडे स्वभावाचा परिणाम तिच्या पुढील आयुष्यावर होऊ शकतो असे त्यांना वाटू लागले. ऐश्वर्याचे वडील एका वृत्तपत्राच्या ऑफिसात चित्रकार म्हणून काम करायचे. त्यांची चित्रकला उत्कृष्ट होती. मग ऐश्वर्याच्या वडिलांनी शनिवार-रविवार संध्याकाळी मुलांना जमवून आपल्या घरी मुलांसाठी चित्रकलेचे वर्ग सुरू केले. अर्थातच त्यांनी ऐश्वर्याला आपल्या चित्रकला वर्गात सामील करून घेतले. चित्रे काढणे, त्यात रंग भरणे यात सर्व मुलांचा वेळ चांगला जाऊ लागला. ऐश्वर्या हळूहळू सर्व मुलांच्यात मिसळू लागली. तिचा वर्गात तसेच समाजात वावरण्याचा आत्मविश्वास वाढू लागला. ऐश्वर्याची एकलकोंडेपणाची समस्या कमी होऊ लागली, तसा घरात सर्वांना आनंद झाला. तिचे वडील तिला शाळेत सोडू लागले. बाप-लेकीमध्ये नेहमी एक सुंदर नाते असते. वडील जर सतत पाठिंबा देणारे व प्रेम करणारे असले, तर मुलीही तेवढ्याच आत्मविश्वास असलेल्या व कणखर बनतात. त्यामुळे आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मुलीचे व वडिलांचे नाते हे वेगळचे असते. ज्यावेळी घरात मुलगी जन्माला येते, त्या दिवसापासून वडिलांचे आयुष्य बदलून जाते. मुलीला वाढविणे, तिच्यावर प्रेम व संस्कार करणे, तिचे संरक्षण करणे, तिचा चांगला मित्र बनणे या सर्व भूमिका बाबाला पार पाडायच्या असतात.

प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांशी भावनिकदृष्ट्या जोडलेली असते. वडील हे तिच्या विश्वास, सुरक्षा व प्रेमाचा पाया असतात. तिच्या वडिलांशी असलेल्या चांगल्या नात्यातून धैर्य व आयुष्यातील संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. आपल्या मुलींना मोठे करत असताना, आईबरोबर वडिलांनी देखील काही पथ्ये पाळणे जरूरीचे आहे. आपल्या मुलींना फक्त सतत सूचना व सल्ले देत राहण्यापेक्षा, मुलींचे म्हणणे ऐकून घेण्याचीही क्षमता त्यांच्यात हवी. जसजशा मुली किशोरावस्थेत जाऊ लागतात, तसतसे त्यांना वडिलांना सर्व गोष्टी सांगायला संकोच वाटू लागतो. अशावेळी वडिलांनी आपल्या लेकीसोबत नाते मैत्रीसारखे ठेवायला हवे. पाल्यामध्ये किशोरावस्थेत विविध शारीरिक व मानसिक बदल होण्यास सुरुवात होते. यावेळी हे नाते अधिक सजग व सुदृढ हवे. पाल्याकडून काही चुका झाल्यास, पाल्याला समजावून सांगितले पाहिजे, म्हणजे आयुष्याच्या पुढील टप्प्यातही हे नाते स्थिर राहील. जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात रस घेतात, तेव्हा तिचा आत्मविश्वास दुणावतो. तिचे करिअर चांगले होते. प्रेमळ वडील हे आपल्या मुलीबाबत चांगली भावना निर्माण करतात, ज्याची मदत तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होते. मुलीचे करिअर ठरविताना किंवा लग्न ठरविताना वडिलांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची असते. आपल्या मुलीला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मार्गदर्शन अथवा मदत करणे हे फार जरूरीचे असते. परंतु मुलीने लहानवयातच घटस्फोट, वडिलांचा मृत्यू अथवा आई-वडिलांची सततची भांडणे पाहिली, तर मुलीच्या जडणघडणीवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. वडिलांशिवाय मुली अबोल, कमी आत्मविश्वास असणाऱ्या व स्वतःचे महत्त्व न समजणाऱ्या होऊ शकतात. वडिलांच्या अभावामुळे मुली समाजात वावरताना एखादा न्यूनगंड घेऊन किंवा दडपणाखाली वावरू शकतात. पाल्याच्या मानसिक व भावनिक विकासात आईप्रमाणेच वडिलांचाही वाटा असतो. मुलींचे संगोपन करताना त्यांना सुरक्षित वाटणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलगी वाईट प्रभावाखाली येण्याची शक्यता संभवत नाही. ज्या मुलींचे वडिलांसोबत नाते चांगले असते, त्यांना आयुष्यातील समस्या सोडवताना त्रास होत नाही.

बाप-लेकींचे परस्परांतील योग्य सुसंवाद, संस्कार यामुळे तिला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत होते. विनया आता लग्नायोग्य वयाची झाली होती. विनयाचे तिच्या वडिलांशी लहानपणापासून मृदू नाते होते. तिच्यावर संस्कार करणे, शाळेचा अभ्यास घेणे, तिला शाळेच्या प्रत्येक इयत्तेत सहलीला पाठविणे, तिचे शिक्षण व करिअर यांना प्रोत्साहन देणे या सर्व बाबतीत त्यांचा पुढाकार होता. विनयाला धाकटा भाऊ होता. त्याच्याकडेही वडिलांचे व्यवस्थित लक्ष असायचे. विनया एम. काॅम. होऊन नोकरीला लागली होती. विनयाच्या कंपनीत एक सी. ए. झालेला, कष्टाळू स्वभावाचा मुलगा होता. त्याने विनयाला लग्नाबाबत विचारले होते. विनयाला तो आवडला, तरी तिने आपल्या पालकांना त्याच्याविषयी सर्व सांगायचे ठरविले. मग विनयाचे वडील पुढाकार घेऊन या मुलाच्या कुटुंबियांना भेटले. सर्वांची परस्परांशी चर्चा होऊन हे लग्न ठरले. आता विनया व तिच्या पतीचा संसार सुखाने चालला आहे. मुलींनी लहानपणापासून जर आपल्या आई-वडिलांचे सुदृढ नाते पाहिले, तर तिचे वैवाहिक जीवनही चांगला आकार घेते. कारण मुले आई-वडिलांच्या नात्यातून बऱ्याच गोष्टी बघत व शिकत असतात. एखादवेळेस मुलीचे वडील अबोल असतील, पण तरीही आपली मुलगी माहेरी आली की, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. इतर वेळी कधी मुलगी व वडिलांमध्ये कुरबूर होत असली तरी, मुलीच्या लग्नात त्यांना दुःख व आनंद असे दोन्ही होत असते. आता वडील आयुष्यातील कर्तव्यातून थोडेसे निवांत झाले की, मुली काहीशा परिपक्व झालेल्या असतात. ज्या वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी इतक्या खस्ता काढल्या, वेळोवेळी आपली आजारपणे झेलली, नोकरी सांभाळून कर्तव्ये पार पाडली, याबद्दल कृतज्ञता ठेवून मुलीने सासर-माहेरचा समतोल राखून वागणे आवश्यक ठरते. आता तिला स्वतःचा संसार सांभाळून, आपल्या पालकांचे व सासरच्या मंडळीचे कर्तव्य करणे योग्य ठरते. या सर्वांसाठी उभे राहणे तिची जबाबदारी बनते. म्हणून म्हणावेसे वाटते, “बाबा, किती रे कष्टं करतोस माझ्यासाठी, आता थांब थोडा थकला असशील, म्हातारा तू झालास, आता थांब जरा तरी”.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -