पूजा काळे
नभांगणी रूप आलं, पुनवेत धुंद न्हालं. उजळल्या दशदिशा, स्वर्ग-दार खुल झालं. लक्ष लक्ष दीपावली, आली माझ्या अंगणात. दूरदेशी शशिधर नव चैतन्य सृष्टीत. एकदा का कोजागरी साजरी झाली की, दिवाळी सणाचे वेध आपसूक लागतात. दिवाळी अंक आणि विशेषांकाची खरी नांदी त्या आधीचं म्हणजे दोन-तीन महिने पूर्वीच होते. कुठल्या विषयावर विशेषांक काढायचा या प्राथमिक अवस्थेपासूनच सुरुवात होते. याला अनुसरून जाहिराती शोधल्या जातात आणि तसतसे साहित्य मागवले जाते. लेखक, कवींना लिहिण्यासाठी उद्युक्त केले जाते. तर दुसरीकडे जाहीर आवाहनाद्वारे पोस्ट टाकल्या जातात. दिवाळीच्या तीन महिन्यांआधी सारे कार्यतत्पर होत कामाला लागतात. दरम्यान कार्यमग्नता इतकी वाढलेली असते की, पुढे वेळही पुरेनासा होतो. लगबग वाढून जमवाजमव होते. शेवटी मुक्काम पोस्ट गाठलं जातं. दिवाळी अंकाला लागून त्याची बांधणी, मुखपृष्ठ सजावट, अक्षर जुळणी, मुद्रण, मुखपृष्ठ सुलेखन, जाहिरात वितरणसेवा यातून एका उत्तम ग्रंथाची म्हणजेच दिवाळी अंकाची निर्मिती होते. सगळ्या टप्प्यांवर वारंवार कटाक्ष ठेवला जातो आणि शेवटी निकाल हाती येतो, तो म्हणजे एकशे पंधरा वर्षं प्रदीर्घ परंपरा असलेला दिवाळी अंक वेगवेगळ्या नामांकनाद्वारे, सहकार्य माध्यमातून दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्या घरात आधी डोकावतो.
या अंकाचा वाचक जर उत्तम जाणकार असेल तर अंक पसंतीस उतरतो. त्याची चर्चा होते. या स्पर्धेत बहुतांश अंकांची रस्सीखेच असते. ताकदीनिशी उभ्या असलेल्या अंकाची विक्री तसेच वाचकांच्या अभिप्रायावर प्रत्येक अंकाचे वैशिष्ट्य अवलंबलेल असते. याचे मुख्य कारण म्हणजे पुस्तकं आपली मित्र असतात आणि आहेत. ग्रंथ आणि दिवाळी विशेषांक हे आपले गुरू असतात, जे प्रवाही असतात. याला प्रवाही म्हणण्याचे कारण एकच की, आपल्या जीवनरुपी समुद्रात हे महान दिवाळी विशेषांक, ग्रंथ दिशादर्शक रूपाने दीपगृहाचे काम करतात. आजच्या मोबाईलच्या जमान्यात, तांत्रिकदृष्ट्या वाचकांची अभिरुची सांभाळत, कागद कालबाह्य होण्याआधी तो सांभाळण्याच्या जबाबदारीतून दीपावली विशेषांक निर्मितीचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. कागदावर चितारलेला शब्द न शब्द माणसाला समृद्ध करतो. योग्य, अयोग्य विचारांचे सामर्थ्य पेलवायला मदत करतो. सृजनशीलतेला पैलू पाडतो. ज्ञानर्जनाचे काम करतो.
मानवाच्या चिरतरुण मनावर कायमचा ठसा उमटवत, अंतःकरणाला झळाळी देणारे दिवाळी अंक विचारयुक्त देवाण, घेवाणीचा सुसंवाद साधतात. मग नकळत विचाराधीन होतो आपण. वाचताना तल्लीन होऊन समविचारांशी मग्न होतो. कारण तारुण्यात मार्गदर्शन करणारी दिवाळी विशेषांक, पुस्तके, ग्रंथ म्हातारपणी मनोरंजनाचे काम करतात. जीवनात शौर्य व आधार देणारी दिवाळी अंक, विशेषांक, इ. ग्रंथसंपदा मनःशांतीसाठी प्रेरक ठरतात. इथे प्रत्येकाला गरज असते आणि आहे, व्यक्त होण्याची, कधी समजून घेण्याची, कधी मोकळं होण्याची. मर्यादेच्या पलीकडे न जाणाऱ्यांसाठी गरज उरते ती वाचनिय ग्रंथांची. मग विचारांच्या आदानप्रदानाचे एकमेव साधन उरत, ते म्हणजे दिवाळी विशेषांक, ग्रंथ. अप्रूप असत त्यात. दिव्य, अनोखं, लखलखतं, विजेप्रमाणे चपळ, मनासारखं कोवळं. कंगोरे उलगडावे तशी संपदा बहरते. स्वतःला म्हणजे आपल्याला शोधण्यासाठी पुस्तक आणि दिवाळी अंकांना जवळ केले की, आपलाही शोध त्वरित संपतो.
पारतंत्र्याच्या काळात पुस्तकरुपी, ग्रंथरुपी ज्ञानार्जन हे एकमेव आयुध होतं स्वराज्याचं. ज्याला आपण स्वर्ग निर्मिती म्हणू, त्यासाठी केलेली ही सोय होती. लोकमान्य टिळकांनी जनजागृती करताना चांगल्या पुस्तकाचे स्वागत करून स्वर्ग निर्माण करण्याचा संदेश दिला होता. त्याचं अंतकरणाने त्यावेळेच्या तरुणांनी त्याचे पालन करून स्वातंत्र्य निर्मितीला हातभार लावला होता. मंडळी कुठलीही भाषा घ्या, त्या भाषेतल्या शब्दाची ताकद एकवटली की, अमूल्य विशेषांक आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतात. बुद्धीला चालना देतात. मेंदूला दर्जेदार खुराक पुरवत प्रदीप्त करतात. तर मज्जातंतूंच्या चेतना जागवण्याचे भान, जिवंतपणाचे अनुभव स्वाहा करतात आपल्यापुढे. यातून तुम्ही उत्तम ते टिपता, हवे तसे निपजता. कारण कुठलाही अंक, ग्रंथ वाचण्याचा छंद जेव्हा ज्याला लागतो, तो माणूस जगात कुठेही सुखी राहू शकतो. वयाच्या एका विशिष्ट बांधावर क्षणाचे असणारे सोबती आयुष्याचे सोबती होण्याचे भाग्य या विशेषांकात दडलेले असत. मनाची भूक भागवणारे ग्रंथ, पुस्तके, दिवाळी अंक आपल्याला अक्षय, अक्षर आनंदाची सोबत पुरवतात.
जीवनभर गुरू असणारे दिवाळी अंक मनाची मशागत साधतात. दिवाळीच्या खुसखुशीत पदार्थांसवे बाजारात नुकतेचंं आलेले दीपावली विशेषांक जुन्या नव्या विचारांचा, साहित्याचा खजिना घेऊन आलेत आपल्यासाठी. परिस्थिती अन्वये माणसाने बदलायला हवं हे खरं पण ग्रंथ आणि पुस्तकांना अंत नाही. जगाच्या शेवटापर्यंत ते आपली सोबत करतील हे विशेष. शिकण्याच्या वृत्तीने घेणाऱ्याने भरायला हवाय तो फक्त आणि फक्त ज्ञानाचा घडा. कारण देणाऱ्याने मुबलक दिले आहे. सुजाण वाचकांची वाट पाहत, कसोशीच्या महाकाय स्पर्धेत उतरलेले मोजकेच पण सुंदर असे दिवाळी अंक जे, वैशिष्ट्यपूर्ण नजराणा घेऊन आलेत आपल्या दिमतीला. वेगवेगळ्या मजकुरातल्या कथा, गूढकथा, कविता, लेख, वैचारिक सामाजिक बांधिलकी जपत एका ओळीत उभे आहेत. फक्त गरज आहे ती एका ट्रान्सफॉर्मेशनची म्हणजे थोडं मागे जाऊन दोन पावलं पुढे जाण्याच्या वृत्तीची आणि वाचन संस्कृती वाढवण्याची. आनंदाच्या ऐन हंगामात दिवाळी विशेषांकचा न संपणारा अमोलिक ठेवा नव्याने आपल्या भेटीला आलाय. सर्वत्र बाजार भरलाय तोरणांनी, फुलांनी, फटाक्यांनी, रहदारीने, त्यासवे तुमची रिक्त मन आजपासून भरून टाका दिवाळी विशेषांकांनी.