डॉ. वीणा सानेकर
दीपावलीनिमित्ताने परदेशातून एका बालमित्राचा फोन आला नि तो भरभरून अनेक गोष्टींबद्दल बोलू लागला. आपला देश सोडून विदेशी वसल्यावर आपल्या भूमीची आठवण येणे साहजिक आहे. विशेष म्हणजे दीपावलीसारख्या सणाच्या निमित्ताने तर आठवणी अधिक तीव्र होतात. अभ्यंग स्नान, उटण्याचा सुगंध, सजवलेल्या रांगोळ्या, झेंडूची तोरणे, दिवाळीचा फराळ या सर्वांसकट साजरा होणाऱ्या दीपावलीच्या सणाशी वर्षानुवर्षे आणखी एक गोष्ट जोडलेली आहेत. ती म्हणजे दिवाळी अंक. पहिल्या मराठी दिवाळी अंकाचा मान जातो का. र. मित्र यांच्या मनोरंजन या अंकाला! ‘बालकवींची आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ ही कविता या अंकात प्रकाशित झाली होती. २०७ पानी या अंकाची किंमत त्या काळात फक्त एक रुपया होती असे समजते.
आज इतर गोष्टींप्रमाणे दिवाळी अंकही महागले, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वाचक महागला. सणानिमित्ताने होणाऱ्या खरेदीत इतर वस्तूंबरोबर दिवाळी अंकांना महत्त्वाचे स्थान होते. आजमितीला महाराष्ट्रात विविध दिवाळी अंक प्रकाशित होतात.विशिष्ट संकल्पनांना वाहिलेले दिवाळी अंक, आकर्षक मुखपृष्ठ, विविध विषयांवर आधारित परिसंवाद, स्त्री प्रश्नांशी निगडित अंक, बोलीभाषेतील अंक, सवलतीत अंक, डिजिटल अंक, बोलके दिवाळी अंक ही गेल्या काही वर्षांतली वैशिष्ट्ये. काळानुरूप दिवाळी अंकांनी नवीन बदल आत्मसात केले. पण दिवाळी अंक हा सण साजरा करण्याच्या शैलीचा भाग बनत नाही तोवर वाचकांची वानवा राहणारच ! दिवाळी अंकांनी महाराष्ट्राच्या नि मराठीच्या संस्कृतीला मोलाचे योगदान दिले आहे. सकस साहित्याची जडणघडण केली आहे.
पुलंची ‘बटाट्याची चाल’ आधी दिवाळी अंकातून व नंतर पुस्तक रूपाने प्रकाशित झाली होती. दीनानाथ दलाल व रॉय किणीकर यांचा ‘दीपावली’, रघुवीर मुळगावकर यांचा ‘रत्नदीप’ हे दिवाळी अंक चित्रकारांची सौंदर्यदृष्टी लाभल्याने अधिक सुंदर झाले. लेखक विविध अंकांकरिता आपले लेखन राखून ठेवू लागले. व्यंगचित्रे आणि हास्यचित्रे हा दिवाळी अंकांचा महत्त्वाचा भाग झाला. शि. द. फडणीस यांची शब्दविरहीत हास्य व्यंगचित्रांची शैली ‘हंस’, ‘मोहिनी’ सारख्या दिवाळी अंकांतूनच परिचित झाली. अतिशय जिद्दीने वर्षानुवर्ष दिवाळी अंकांची परंपरा प्रकाशकांनी सुरू ठेवली. नव्या पिढीतील तरुणांनी प्रकाशक या नात्याने ही धुरा खांद्यावर घेतली. हे चित्र अतिशय आश्वासक आहे. या सर्व वाचन व्यवहाराला मराठीपणाच्या खुणा जपणाऱ्या वाचकांचे पाठबळ मात्र हवे.