युवराज अवसरमल
हिंदी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट चरित्र अभिनेता असे त्याला म्हटले, तर वावगे ठरणार नाही, असा एक अभिनेता आहे त्याचे नाव आहे महेश ठाकूर. त्याची ‘हम साथ साथ है’ चित्रपटातील आनंदबाबूची भूमिका खूप लोकप्रिय ठरली. प्रेक्षक आज देखील त्याला या भूमिकेसाठी लक्षात ठेवतात. तो दिसला की, आनंद बाबू या नावाने हाका मारतात. महेशचे शालेय शिक्षण बांद्राच्या सेंट स्टनीस्लाऊस शाळेत झाले. त्यांच्या वर्गात अभिनेता अरबाज खान होता, तर अभिनेता सलमान खान त्याला एक वर्ष सीनिअर होता. शाळेत असताना त्याला लागोपाठ दोन वर्ष नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते. नंतर त्याने एच. आर. कॉलेज मधून शिक्षण घेतले. काही फॅशन शो त्यांनी केले. त्यावेळी त्याचा ब्रेक डान्सचा ग्रुप होता. माइकल जॅक्सनचा एक अल्बम आला होता, त्यातलेे गाणे त्याने बसविले होते. संजय गढवी (धूम चित्रपटाचा दिग्दर्शक) या मित्राला त्याने डान्स शिकवला होता.
१२ वी नंतर ते एम. बी. ए. शिकण्यासाठी अमेरिकेला गेले. तेथे शिकत असताना त्यांनी त्यांच्या हिंदू मंडळीच्या ग्रुपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू लागले. त्यावेळी अभिनयाला व्यवसायाचा दर्जा नव्हता. अभिनयाकडे केवळ छंद म्हणून पाहिले जात होते. त्यावेळी अभिनेता आमिर खानचा नवा चित्रपट, अक्षय कुमारचा नवीन चित्रपट हिट झाला होता. अभिनेता सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ आला होता, तो हिट ठरला होता. चित्रपट सृष्टीत नवीन अभिनेत्याला घेऊन चित्रपट बनविण्याची लाट आली होती. महेश त्या वेळी अमेरिकेहून मुंबईला त्यांच्या आजीची तब्येत बरी नसल्याने तिची देखभाल करण्यासाठी आले होतेे. ते नियमितपणे जिमला जात असत. एके दिवशी जिममधील एका मित्राने त्यांना शुटिंग- शर्टिगच्या मॉडेलिंगची ऑफर दिली. जाहिरातीचे काम झाल्यावर त्यांना पैसे देखील मिळाले. जाहिरातींमधून पैसे मिळतात या गोष्टीचा त्यांना सुखद धक्का बसला. त्या पैशाने त्यांनी आजीसाठी भेटवस्तू घेतल्या. स्वतः साठी शर्ट, बूट घेतले. सगळे पैसे खर्च केले. आनंद साजरा केला. त्यानंतर अजून काही जाहिराती त्यांना मिळाल्या. त्यानंतर त्यांना टीव्हीसाठी काम मिळाले. नंतर त्यांना पहिला चित्रपट मिळाला. चित्रपटाचे नाव होते – मेरी जानेमन. त्यामध्ये कादर खान, शक्ती कपूर, सुनयना, पूनम दास गुप्ता हे कलावंत होते. त्यानंतर त्यांना झी टीव्हीवरील मालिका मिळत गेल्या. वडिलांना वाटत होते त्यांनी अमेरिकेला परत यावे; परंतु इथे ते आजीची काळजी घेत होते व काम देखील करत होते. त्यानंतर त्यांच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला, त्यांना सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट मिळाला. त्यामधील त्यांची आनंद बाबूची भूमिका आज देखील प्रेक्षक विसरले नाहीत. महेश कुठे ही गेले की, त्यांना पाहिल्यावर प्रेक्षक आनंद बाबू म्हणून हाक मारतात. त्या चित्रपटामुळे मिळालेली लोकप्रियता आज देखील टिकून आहे. हा चित्रपट कसा मिळाला यामागे देखील एक घटना आहे. महेश स्पॅनिश भाषा शिकले होते. दरार नावाची मालिका करीत असताना ज्येष्ठ लेखक टंडन महेशला म्हणाले की, त्यांचा एक मित्र आहे. त्याने एक चित्रपट स्पॅनिशमध्ये डब केला होता. तो बरोबर आहे की, नाही हे पाहण्यासाठी त्यांनी महेशला पाठविले. महेश त्या ऑफिसला गेले, तो चित्रपट पाहिला, त्याबाबत करेक्शन सांगितले. तो चित्रपट होता – मैने प्यार किया. तेथे उपस्थित होते दिग्दर्शक सूरज बडजात्या. त्यांची त्यावेळी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची जुळवाजुळव चालली होती. त्यांनी लगेच महेशला आनंद बाबूची भूमिका दिली. हा सगळा नशिबाचा खेळ आहे असे ते मानतात. सब टीव्हीवर ‘डोली लेके आयी दुल्हनियाँ’ या मालिकेत ते कांचन अधिकारी यांच्यासोबत होते.
दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे अभिनेत्री श्रीदेवीची मालिका मिसेस अय्यर त्यांना श्रीदेवीच्या नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्या अभिनयाची गाडी सुस्साट धावत होती.‘स्टँड अप मिस्टर खुराणा’ हे त्यांचे नवीन हिंदी नाटक आहे. त्यामध्ये वडील व मुलीच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करण्यात आले. या नाटकामध्ये ते वडिलांच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना हे नाटक नक्कीच आवडेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. महेशला त्यांच्या या नवीन नाटकासाठी हार्दिक शुभेच्छा !