Sunday, December 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजही दिवाळी एकमेकांना जपण्याची...

ही दिवाळी एकमेकांना जपण्याची…

‌‘दिवाळी पहाट‌’चे जवळपास ११ कार्यक्रम करत असल्याचा एक कलाकार म्हणून होणारा आनंद खूप मोठा आहे. माझे सगळे कुटुंब ‌‘दिवाळी पहाट‌’च्या कार्यक्रमाला तिकीट काढून पहिल्या रांगेत बसतात, मनापासून आनंद घेतात. तेव्हा अशाप्रकारे एकमेकांना समजून दिवाळी साजरी करण्याची भावना कुटुंब, समाज आणि त्यातील प्रत्येक स्तरात रुजायला हवी.

संकर्षण कऱ्हाडे

सध्या आपण अति संवेदनशील झालो आहोत. सोशल मीडिया, समाज, राजकारण, जातीपाती या सगळ्या माध्यमांमधून अति संवेदनशीलतेचे हे चित्र स्पष्ट होते. म्हणूनच या दिवाळीच्या निमित्ताने आपण बॅक टू बेसिक जाण्याचा प्रयत्नही करावा असे वाटते. पूर्वीचे जगणे अगदी साधे होते. पण लाईफस्टाईलच्या नादात आता आपण सगळ्याच बाबतीत फार पुढे गेलो आहोत. दिवाळीत तरी थोडे थांबूया आणि एकमेकांचा हात धरूया.वसुबारसेपासून सुरू होणाऱ्या दिवाळीची रंगत चढत्या भाजणीने वाढत जाते आणि निर्माण होणारे आनंद तरंग पुढील बराच काळ आयुष्य झुलवत ठेवतात. नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान, भल्या पहाटे घेतले जाणारे देवदर्शन, घरातील थोरामोठ्यांच्या भेटीगाठी, एकत्रित फराळ आणि नंतरची सुस्तावलेली दुपार हा दिनक्रम दिवाळीची गंमत वाढवून जातो. श्रीकृष्णाने नरकासुराच्या केलेल्या वधाचे स्मरण करत कृष्णाची पूजा करून हा दिवस पार पडतो. सायंकाळी अंगणात दिवे लावून वाईटाचा अंधार दूर करण्याची आणि सकारात्मकतेची स्वागत करण्याची प्रथा मनोभावे पाळली जाते. दिवाळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशीदेखील अभ्यंगस्नान आणि देवदर्शनादी कार्यक्रमांनी सणाची सुरुवात होते. मिष्टान्नभोजनाचा सहकुटुंब आनंद घेतल्यानंतर सायंकाळी लक्ष्मीची यथाशक्ती पूजा केली जाते. या मंगलप्रसंगी घरातील सोनेनाणे, मौल्यवान वस्तू, रोख रक्कम यांच्यासह केरसुणीचीही पूजा होते. लक्ष्मीमातेला फळे, मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. रोषणाई केलेल्या घरामध्ये, दारी दिव्यांच्या माळा लुकलुकत असताना साजरी होणारी ही पूजा मोठी साजिरी दिसते. बलिप्रतिपदा हा दिवाळीतील आणखी एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी आख्यायिका आहे. त्याचे स्मरण ठेवत हा दिवस साजरा होतो. पती-पत्नीमधील नात्याचे रंग गहिरे करणारा दिवस, अशीही या सणाची ओळख आहे. या दिवशी पत्नी पतीला औक्षण करते. पती सुंदरशी भेटवस्तू देऊन तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो. या दिवशी आईदेखील मुलाला औक्षण करते.

भाऊबीजेच्या सणाचा तर थाटच वेगळा. ‌‘लाडकी बहीण‌’ मोठ्या ओढीने भावाच्या घरी येते. भावा-बहिणीमधील सुंदर नात्याला यानिमित्ताने वेगळे कोंदण मिळते. दोन्हीही कुटुंब एकत्र येत हा दिवस आनंदाने साजरा करतात. औक्षण, ओवाळल्यानंतर मिळणारी भेटवस्तू, भावाचे कोडकौतुक करण्यात गुंग होणे हे सगळेच दृश्य भावा-बहिणीमधील रक्ताच्या नात्याचे गहिरे बंध दर्शवून जाते. भाऊबीज हा दिवाळीतील अखेरचा दिवस. पण या सगळ्या साजरीकरणात एकत्र येणे, एकमेकांचे कुशल विचारणे, विचारांची देवाण-घेवाण, मनोरंजनाचे कार्यक्रम या सगळ्यांतून मिळणारा आनंद पुढील वर्षभर टिकतो. असे हे दीपावलीचे पर्व आनंद घेऊन आले. प्रत्येकच दिवाळी सगळ्यांसाठी पर्वणी असते. यंदाच्या दिवाळीने तर मला खूप व्यस्त ठेवले आहे. हे सगळेच दिवस भरगच्च कार्यक्रमांनी सजलेले आहेत. ‌‘दिवाळी पहाट‌’चे जवळपास ११ कार्यक्रम करत असल्याचा एक कलाकार म्हणून होणारा आनंद खूप मोठा आहे. मुख्य म्हणजे या कार्यक्रमांच्या निमित्ताने मला आनंद भाटे, राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, आरतीताई अंकलीकर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर, तर तरुण पिढीतील आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे, सन्मिता धापटे-शदे अशा सगळ्यांबरोबर काम करण्याची, स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. पुणे, नागपूर, बोरिवली, ठाणे अशा विविध शहरांमध्ये पार पडणारे हे कार्यक्रम माझ्यासारख्या कलाकाराला सुखावून जाणारे होते.

शेवटी दिवाळी हा समृद्धी आणि संपन्नतेचा सण आहे आणि व्यस्त राहिल्याखेरीज कलाकाराला ती मिळत नाही. तेव्हा यंदाच्या दिवाळीने व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणून मी या व्यस्ततेचे मनापासून स्वागत करतो. कारण ती मिळवण्यासाठीच माझ्यासारखे अनेकजण मुंबईत येत असतात. तेव्हा वैयक्तिकदृष्ट्या सांगायचे तर ही दिवाळी अशी लगबगीची आणि अभिव्यक्तीचे अपूर्व समाधान देणारी आहे. दुसरीकडे स्वत:च्या परिघाबाहेर जाऊन विचार करता या देखण्या सणाचे अनेक कंगोरे दिसतात. पूर्वी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जायचे. आता त्याचे प्रमाण कमी झाले असले तरी संपलेले नाही. खरे सांगायचे तर दिवाळीत दारू उडवण्यामागील कारणच एकदाच मनातल्या बारुदाचा निचरा करणे, हे आहे. एकदा मनातील निराशेचा, क्षोभाचा, नकारात्मतेचा फटका फुटला; मोठा आवाज झाला की, नंतर पणतीसारखे शांत तेवत राहावे, असे मला वाटते. सध्या आपण आयुष्याकडे नानाविध कोनातून पाहतो. नानाविध तर्क लावतो. राजकारणामुळे म्हणा वा अन्य कोणत्या गोष्टींमुळे… सध्या वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. कोणत्याही गोष्टीविषयी एखादे मत मांडले आणि त्यामुळे ठरावीक लोकांच्या भावना दुखावल्या तर ते आपल्याबरोबरच समाजासाठीही अतिशय त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच आपणा सर्वांनी, समाजाने ही दिवाळी संवेदनशीलतेची दिवाळी म्हणून साजरी करायला हवी. कोणालाही न दुखवता, कोणाविरुद्ध काही चुकीचे न बोलता, कोणालाही त्रास होईल असे न वागता एकमेकांना जपण्याची ही दिवाळी असायला हवी, असे समाजाचा एक घटक या नात्याने प्रामाणिकपणे वाटते.
दिवाळी हा एकमेकांना त्रास देण्याचा काळ नाही. आपण सगळेच वेगवेगळ्या बाबतींमध्ये संवेदनशील झालो असून सोशल मीडिया, समाज, राजकारण, जातीपाती या सगळ्या माध्यमांमधून अति संवेदनशीलतेचे हे चित्र स्पष्ट होते. या दिवाळीच्या निमित्ताने आपण ‌‘बॅक टू बेसिक‌’ जाण्याचा प्रयत्नही करावा. पूर्वीचे जगणे अगदी साधे होते. पण लाईफस्टाईलच्या नादात आता आपण सगळ्याच बाबतीत फार पुढे आलो आहोत. याचा परिणाम म्हणजे सगळ्याच गोष्टींचा चिकित्सक अभ्यास करायला शिकलो आहोत. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर आजी-आजोबांच्या काळात गूळ वापरा, पौष्टिक खा, एकमेकांना भेटा, मनमोकळ्या गप्पा मारा, मन मोकळे करा, भावनांचा निचरा करा हे कधी कोणाला सांगावे लागत नसे. ते सहजतेने, जगण्याचा एक भाग म्हणून घडत होते. पण आता ते आवर्जून सांगावे लागते. म्हणूनच आता ‌‘बॅक टू बेसिक‌’ या अर्थाने दिवाळी साजरी करायला हवी. दिवाळीनिमित्त रोषणाई केली पाहिजे, तेवढ्या गाठीभेटीही घेतल्या पाहिजेत. ही दिवाळी नात्यांचे महत्त्व ओळखून साजरी करायला पाहिजे.

आमच्याकडे परभणीला दिवाळीला घरी आला नाही असा एकही माणूस नसायचा. त्यात बाबांच्या बँकेतले शिपाई यायचे, काम करणारी बिस्मीला भाभी, गल्लीतले ऑटोवाले, हातगाडीवाले असायचे. थोडक्यात आजोबांच्या जुन्या मित्रांपासून, बाबांचे मित्र, सहकारी, आम्हाला शाळेत सोडणारे अब्दुल चाचा अशा सगळ्यांचीच सरमिसळ असायची. केळीच्या पानावर सगळ्यांचा एकत्रित फराळ असायचा. तशी दिवाळी पुन्हा साजरी व्हायला हवी. परभणीला अनुभवली तशी… एकदा बाबांनी आमच्यासाठी ५०० रुपयांचे फटाके आणले होते, तर वाटले होते की, अरे बापरे… आपण त्यांना इतका जास्त खर्च करायला लावला. आता इतक्या पैशात फुलबाजीचे पाकीटही येत नाही. त्यामुळे ही दिवाळी खर्चापेक्षा मोल ओळखण्याची असावी असे मनापासून वाटते. ही दिवाळी नात्यांमधला समजूतदार परत आणण्यासाठीही असावी. अगदी घरातले उदाहरण सांगतो. आधी मी दिवाळीत तरी परभणीला यावे, असे बाबांना खूप वाटायचे. पण हेच आमच्यासारख्या कलाकारांसाठी व्यस्ततेचे दिवस आहेत हे समजू लागले तसा त्यांनी हा हट्ट सोडला. आता ते म्हणतात, आम्हीच सगळे मुंबईला येतो. तुझी व्यस्तता हीच आमची दिवाळी…! त्यानुसार आता माझे सगळे कुटुंब ‌‘दिवाळी पहाट‌’च्या कार्यक्रमाला येते. मंडळी तिकीट काढून पहिल्या रांगेत बसतात आणि मनापासून आनंद घेतात. तेव्हा अशाप्रकारे एकमेकांना समजून घेऊन दिवाळी साजरी करण्याची भावना कुटुंब, समाज आणि त्यातील प्रत्येक स्तरात रुजायला हवी.

आणखी एक सांगायचे म्हणजे सोशल मीडिया, ट्रोलिंग, आरक्षण, निवडणुका अशा कोणत्याही माध्यमातून एकमेकांना न दुखावण्याची ही दिवाळी व्हायला हवी. शेवटी सगळे आपले आहेत. मनात नेहमी एक विचार येतो की, आता एकमेकांविरुद्ध उभी ठाकणारी, भांडणारी दोन माणसे उद्या भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असतील आणि समोरून एखादा दहशतवादी येत असेल तर निश्चितच ते दोघे मिळून त्याला मारतील ना? मग याच भावनेने इथेही जगायला काय हरकत आहे? तेव्हा आपल्या असतील त्या भावना, विचार, म्हणणे एकमेकांना हलक्या स्वरात आणि चांगल्या भाषेत सांगून सगळ्यांना आपलेसे करायची ही दिवाळी आहे. शिवाजी महाराजांच्या काळात आपण सगळेच एक होऊन लढलो आहोत. अठरापगड जातींचे लोक एकत्र येऊन, प्रत्येक स्तरावरचा माणूस एकत्र येऊन परकीय आक्रमकांना पळताभुई थोडी केली आहे. आपल्याला सर्जिकल स्ट्राईक, गनिमी कावा, स्त्री सुरक्षा, पेन्शन योजना, शेतीचे ज्ञान, सुरक्षा आणि सुराज्य हे सगळेच शिवरायांनी दिले आहे. थोडक्यात वाढलेले पान समोर तयार आहे. आपल्याला फक्त ते पुरवून पुरवून खायचे आहे. ते पुरवून खाण्याची ही दिवाळी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -