राज चिंचणकर
सध्या मराठी नाट्यसृष्टीत एक प्रश्न चर्चिला जात आहे आणि तो म्हणजे ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी…’ नक्की काय होणार? अर्थात याचे कारणही तसेच आहे. लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे ही जोडी एकत्र आल्यावर रंगभूमीवर वेगळे काहीतरी दिसणार याचे सूतोवाच आपसूक होतेच. हीच जोडी आता रंगभूमीवर ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी…’ हे नवीन नाटक घेऊन येण्यास सज्ज झाली आहे.
या सगळ्यात अजून आकर्षणाचा भाग म्हणजे या नाटकात आदिनाथ कोठारे, प्रियदर्शन जाधव, रसिका सुनील व गौतमी देशपांडे असे आघाडीचे कलावंत भूमिका साकारत आहेत. या नाटकाविषयीची अजून एक औत्स्युक्याची गोष्ट म्हणजे हे नाटक महेश अंबर कोठारे रंगभूमीवर सादर करत आहेत. ‘स्टोरी टेलर्स नूक’ प्रस्तुत, ‘अस्मय थिएटर्स’ची निर्मिती असलेले हे नाटक निर्माते अजय विचारे व आदिनाथ कोठारे रंगभूमीवर आणत आहेत. या नाटकाचे लेखन व नेपथ्य नीरज शिरवईकर यांनी केले असून, दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. अजित परब यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. श्रीकांत तटकरे या नाटकाचे सूत्रधार आहेत. अलीकडेच या नाटकाचा मोठ्या उत्साहात मुहूर्त करण्यात आला असून, हे नाटक आता लवकरच रंगभूमीवर येत आहे.