रमेश तांबे
दिवाळीचा सण दहा दिवसांवर आला होता. पण अजून पैशांची व्यवस्था झाली नव्हती. म्हणून रामू बैचेन होता. घरात दोन लहान मुले, बायको सारे रामूची चातकासारखी वाट पाहत होते. संध्याकाळचे सहा वाजले तरी रामूची पावले घराकडे वळेनात. तो बाजारातून उगाचच भटकत होता. रस्त्यावर जागोजागी फटाक्यांची, फराळांची दुकाने सजलेली दिसत होती. रंगीबेरंगी आकाश कंदील प्रकाशमान झाले होते. रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्यांची प्रचंड गर्दी होती. दुकानदार, फेरीवाले ग्राहकांना आपला माल विकण्यात गर्क होते. पण एका एवढ्या कलकलाटात, एवढ्या गर्दीत रामू मात्र शांत होता आणि एकटा होता! रामू दोन तास बाजारात भटकत होता. करंज्या, लाडू, अनारसे, चकल्या अशा अनेक पदार्थांच्या पिशव्या भरलेल्या एका दुकानासमोर रामू उभा राहिला. खिशात पैसे नसल्याने दुकानदाराला विचारू शकत नव्हता की, फराळाची किंमत काय! त्या फराळाकडे आशाळभूत नजरेने बघता बघता रामूच्या डोळ्यांसमोर त्याची दोन मुले त्याला दिसू लागली. छान कपडे घातलेली. त्याची लाडकी मुलगी रूपा आणि डोळ्यांवर गॉगल लावलेला त्याचा मुलगा आनंद! त्यांच्या हातात फटाक्यांची आणि फराळाची पिशवी होती. त्यांच्या मागे सुंदर साडी नेसलेली बायको रत्ना त्याला दिसली. रामू खडबडून जागा झाला, तर समोरच्या गर्दीत त्याला कुणीच दिसले नाही.
रामूला कळून चुकले होते. ही दिवाळीची मजा आपल्यासाठी नाही. आपल्यासारख्या गरिबांकडे कुठून येणार एवढे पैसे! पण आता घरी गेल्यावर बायको मुलांची समजूत कशी काढायची याची त्याला चिंता सतावत होती. काय करावे त्याला कळेना. एखादी फराळाची पिशवी घेऊन पळून जावे असाही विचार रामूच्या मनात आला. पण रामू चांगल्या विचारांचा, चांगल्या संस्कारांचा होता. इमानेइतबारे आपले काम करावे, महिन्याअखेरीस संपूर्ण पगार बायकोच्या हातात द्यावा आणि निवांत राहावे या वृत्तीचा तो होता. त्यामुळे मनात आलेला चोरीचा विचार त्याने झटकून टाकला आणि घराकडे वळला. थोड्याच वेळात रामू घरी पोहोचला आणि समोरचे दृश्य तो बघतच राहिला! कारण त्याच्या घराला रोषणाई केली होती. घरासमोर रंगीत आकाश कंदील लावला होता. दरवाजा-खिडक्यांमध्ये पणत्या तेवत होत्या. घरासमोर रांगोळी काढली होती. आपल्या अंधारमय जीवनामध्ये हे प्रकाश रंग कोणी भरले याचे त्याला कुतूहल वाटले!
तितक्यात रामूची मुलगी रूपा छान छान कपडे घालून फराळ खात खात बाहेर आली आणि रामूला बघताच, “बाबा आले बाबा आले” असे म्हणत नाचू लागली. तिच्या पाठोपाठ मुलगा बायको सारेच बाहेर आले. त्या दोघांच्याही अंगावर नवे कपडे होते. आपल्या घराचे अन् मुलाबाळांचे हे बदललेले रूप बघून तो आश्चर्यानेच ओरडला, “रूपा कोणी दिले हे सारे.” मग रामूची बायकोच मोठ्या आनंदाने सांगू लागली, “अहो तुमच्या फॅक्टरीच्या मालकाने दिले सारे. ते स्वतः आले होते गाडी घेऊन. ते म्हणाले, “रामूला सांगा कुलकर्णी काकांकडून दिवाळी भेट!” कुलकर्णी काकांचे नाव निघताच रामूचे डोळे भरून आले. कारण त्यांच्या इतका सहृदयी माणूस त्याने कधीही पाहिला नव्हता. गेले सहा महिने फॅक्टरीत काहीच काम नव्हते. तरी ते सर्वांना पगार देत होते. सगळ्यांचा घर-संसार चालवत होते. रामूचे डोळे भरून आले. त्याने आकाशाकडे बघत देवाला प्रार्थना केली, “हे देवा आमच्या कुलकर्णी काकांना उदंड आयुष्य दे!”