प्रा. प्रतिभा सराफ
कोरोना महामारीच्या भयावह काळात संपूर्ण जग घरात बंदिस्त झाले होते, त्या जीवघेण्या घुसमटीच्या चौकटीतून माणसांना थोड्याफार प्रमाणात का होईना, मानसिक बळ देऊन, सर्वार्थाने जगण्याचे बळ देण्याचे काम खऱ्या अर्थाने साहित्याने केले. विविध प्रकारचे माहितीपर साहित्य असेल किंवा मनोरंजन करणारे साहित्य असेल जे आपण वेगवेगळ्या सोशल मीडियातून वाचले, ऐकले, पाहिले. साहित्य वाचनाची किंवा साहित्य लेखनाची मोठ्या प्रमाणात सवय कोरोना काळात अनेकांना लागली. या काळात अनेक संस्थांनी आपापले दिवाळी अंकही सुरू केले. सुरुवातीला हे अंक डिजिटल स्वरूपात होते पण आता छापील स्वरूपात बाजारात आलेले दिसतात. ‘दिवाळी अंक काढणे’, हे खूप जोखमीचे काम आहे. अंकासाठी चांगले साहित्य सहज मिळते; परंतु हा अंक छापून आल्यावर, बाजारात गेल्यावर त्याची विक्री होईलच याची शाश्वती देता येत नाही. कधी कधी खूप मोठे नुकसानही होऊ शकते. जाहिरातींच्या बळावर अंक काढता येतो; परंतु या जाहिराती नेमक्या कुठून मिळवायच्या, कशा मिळवायच्या, कधी मिळवायच्या याविषयीची माहिती नव्याने अंक काढणाऱ्यांना नसते. पदरमोड करून काढलेल्या अंकांचे गठ्ठे दिवाळीनंतर पाहताना किती हळहळ जाणवत असेल याची कल्पनाच करवत नाही. अत्यंत दर्जेदार अंकसुद्धा हळूहळू आर्थिक व्यवहार न जुळल्यामुळे बंद पडलेले आपल्याला दिसून येतात.जीवन – मरणाच्या दाराशी चाललेला संघर्ष, आर्थिक विवंचना, अंधारमय भविष्य याच्याशी लढणाऱ्या लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून, प्रत्येकाला काहीतरी मिळेल अशा, असंख्य साहित्यिक – सांस्कृतिक – सामाजिक साहित्याचा खजाना असलेले दिवाळी अंक सकारात्मकता पसरवतात. मनोरंजनाबरोबर वैचारिक दिशा देतात. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगभरातील माणसांना जोडतात, त्यांच्या मनात लेखन स्फूर्ती जागवतात. ज्यांनी कधी क्रमिक अभ्यासक्रमापलीकडचे पुस्तकही वाचले नव्हते, त्यांची कोरोना काळात बहरलेली प्रतिभा यामुळे मोठ्या प्रमाणात पुस्तक निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे ही आनंददायी गोष्ट आहे; परंतु लेखन करणाऱ्यांनी खूप वाचनही केले पाहिजे!
तरुण पिढी फारसे पुस्तकांचे लेखन – वाचन करीत नाही, अशी सर्वत्र ओरड सुरू असताना, मला कौतुकाने सांगायला आवडेल की, आजकाल निश्चितपणे काही प्रमाणात तरुण मंडळी आहेत ज्यांनी मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामामध्ये झोकून दिलेले आहे. असे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे दिवाळी अंक बाजारात आलेले आहेत.
दिवाळी अंकांच्या निर्मितीसाठी सहसंपादन, दिवाळी अंक स्पर्धांमध्ये परीक्षक अशी कामे केल्यावर माझ्या लक्षात आले की, दिवाळी अंक म्हटल्यावर सर्व प्रकारचे वाचक गृहीत धरून, त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मुख्यत्वे दिवाळी अंक काढले जातात. त्यामुळे साहित्यिक अंकात आपल्याला कधी पानपुरके, कधी राशिभविष्य, तर कधी खाद्यपदार्थ कृतीही वाचायला मिळतात.अनेक वर्षे दिवाळी अंकांची परंपरा जपत असणाऱ्या अंकांसोबत, नव्याने मराठी साहित्य विश्वात, आत्मविश्वासाने आपले दमदार पाऊल टाकू पाहणाऱ्या, बहुविध साहित्य कृतीने सजलेल्या, मनोरंजनाबरोबर आशयकेंद्री वैचारिक दिशा देणाऱ्या दिवाळी अंकांचे आपण स्वागत करूया. प्रत्येक मराठी माणसाने अगदी ठरवून कमीत कमी दोन दिवाळी अंक तरी विकत घेऊया, जेणेकरून दिवाळी अंक निर्मिती करणाऱ्या संपादकांना, साहित्यिकांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल आणि अगदी ठरवून आपण वाचलेले साहित्य आपल्याला आवडले किंवा नाही आवडले तरीही ते का आवडले नाही हे एखाद्या साहित्यिकाला कळवलेत, तर त्यांनाही निश्चितपणे आनंद होईलच!
तर चला कामाला लागू या. दिवाळी अंक विकत घेऊन वाचूया आणि खरंच शक्य नसेल, तर कोणत्यातरी लायब्ररीचा दिवाळी अंक वाचक सभासद होऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करूया!
pratibha.saraph@ gmail.com