भालचंद्र कुबल
मला कधी कधी रंगभूमीवर बदलत गेलेल्या काही काही प्रथांचे जाम आश्चर्य वाटत राहते. प्रश्न पडतो की, या प्रथा कुणीतरी सुरू केल्या असतीलच पण मग त्या मागे काही विशेष असा दृष्टीकोण (अजेंडा या अर्थी) होता का? मग त्याचे स्वरूप बदलायला काय कारणे घडली असतील? हल्ली कुठलीही कारवाई सरसकट हिंदू विरोधी समजण्याची जशी फॅशन आलीय, तसे काही सामाजिक षडयंत्र तर नसेल? (हा आपला उगाचच एक अंदाज…!) तर अशा अदमास पंचे दाहोदर्से प्रथांपैकी ‘दिवाळी पहाट’ नावाचा जो सुळसुळाट झालाय त्यावर आज लिहू म्हणतोय. दिवाळी सुरू व्हायच्या पाच-सहा दिवस अगोदरपासून सर्वाधिक खपाच्या वर्तमान पेपरातून या दिवाळी पहाटांच्या जाहिराती उगवायला लागतात. नाटकांच्या जाहिराती शोधू म्हटल्या तरी सापडणार नाहीत इतक्या या पहाट्स बोकाळलेल्या आहेत. हल्ली तर महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या शहरात एक तरी पहाट उजाडतेच. अर्थात मुंबईकरांचे अनुकरण नाही केले तर आपण सामाजिकदृष्ट्या मागास ठरतो, असा देखील एक समज समाजात रुजलाय. त्यामुळे आपणही प्रगत आहोत हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रात यंदा साधारणतः ३५० च्या आसपास (यात संध्याही आल्या) असे कार्यक्रम आयोजित केले गेलेत. त्यातही निवडणुका तोंडावर आल्याने अशा कार्यक्रमांना प्रायोजकही हात जोडून ‘उभे’ आहेत. पण मग अशा कार्यक्रमातून नेमकं काय साध्य होते?
साधारणतः ९० च्या दशकात दिवाळी सामाजिक स्तरावर साजरी करण्यासाठीच्या काही संकल्पनांवर विचार सुरू झाला. पुण्यातील डॉ. सतीश देसाई यांच्या मनात ‘दिवाळी पहाट’ ही संकल्पना आकाराला आली आणि आपल्या ‘त्रिदल’ संस्थेद्वारे त्यांनी १९९३च्या दिवाळीला ‘दिवाळी पहाट’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा भरणा आजही तसा अधिकच आहे. पारंपरिक रिवाजांना अनुसरून अभ्यंग स्नानासाठी पहाटे उठून एकदा का फराळ झाला की पुन्हा झोपण्याऐवजी एखादा भावगीतांचा कार्यक्रम सपत्निक चघळावा, हा त्यामागील मूळ हेतू असावा कदाचित… किंवा आंघोळ करून चहा झाला की, उरल्या सुरल्यांच्या फराळाची तयारी होई पर्यंत ही बुजुर्ग मंडळींना लुडबुड करु न देण्याची सोय असावी. अशा सोयी पुण्यातूनच जगभरात प्रसारित झाल्यात.
पहिली दिवाळी पहाट सजवणारे कलाकार होते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर. परंतु नवीन संकल्पना पहिल्याच प्रयत्नात रुचेल ते पुणे कसले…? त्यामुळे देसाई यांच्या या पहिल्या-वहिल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला पुणेकरांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. हा कार्यक्रम म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. यात डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या टीमला आर्थिक नुकसानही सहन करावे लागले; पण असे असले तरीही पुढच्या वर्षीही ही दिवाळी पहाट आणखी छान पद्धतीने सजवायची असे त्यांनी ठरवले. पुढील वर्षी मग देसाई यांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व नाट्यगृहात केले. या कार्यक्रमापासून पुढे मग दिवाळी पहाट या संकल्पनेला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. दिवाळी पहाट ही अगदी मानाची, प्रेमाची, आदराची गोष्ट ठरली. आता तर दिवाळी पहाट कार्यक्रम केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशमध्ये इंदूर, गुजरातमध्ये बडोदा, हैदराबादमध्येही ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता या अस्सल मराठी कार्यक्रमाने महाराष्ट्राची वेस तर ओलांडलीच आहे, शिवाय देशाचीही सीमा पार करून तो सातासमुद्रापार गेलाय. अमेरिकेत शिकागो येथील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळातर्फे दिवाळी पहाट साजरी केली जाते. इंग्लंड, कॅनडा, दुबई या देशांतही ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आता नाट्यनिर्मात्यांना आणि निर्माते बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना कळून चुकलेही की हा कार्यक्रम प्राॅफीट मिळवून देऊ शकतो. याचा फाॅरमॅट धांगडधिंगा स्वरूपाचा नसून फतकल मारून बसलेल्या गायक-गायिकांकडून भावगीते म्हणवून घेणारा असतो. जनरली ज्येष्ठ नागरिकांच्या कलाने हा कार्यक्रम फिरत राहातो. मग एखादा निर्माता ज्येष्ठ परंतु अजूनही डिमांड असलेले प्रभावळकर, नलावडे, गवाणकर, ओक यांना साद घालतात. (ही नावे प्रातिनिधिक आहेत.) यांनी “ओ” नाही दिली तर मग हल्ली बिग बाॅसच्या शिव ठाकरेपासून, सुरज चव्हाण, बिचुकले इत्यादींना देखील डिमांड आलाय. परवा तर एकजण सांगत होता, इंद्रायणी तर शूटिंग आटोपून डायरेक्ट पहाटेच्या कार्यक्रमाला स्टेजवरच झोपायला जाणाराय म्हणून…! (खरं खोटं नरकासुराला ठाऊक). एका संस्थेने तर कार्टी फोडायलाच कार्यक्रमाला या म्हटलय…!
असो…!काय असतं ना एखादी प्रथा रूढ होण्यास वेळ लागंत नाही आणि मग तिचा विपर्यास केला जाण्याच्या शक्यता हल्लीच्या लिव्हिंग स्टाईल्समुळे बळावल्यात. परवाच एका नाटकाला, नाटक सुरू होण्याआधी रंगमंचावर पुजलेला नारळ फोडून त्याचा प्रसाद वाटला गेलेला पाहिला आणि धस्स झाले. रंगमंचावरील पूजा ही विघ्नहर्त्या मुळारंभ देवतेची गणेशाची असते. नारळाला श्रीगणेश म्हणून पुजल्यावर तो लगेचच फोडून खाण्याचे कुठले हे शास्त्र? माझ्या अल्पमतीनुसार फोडला जाणारा नारळ हा वाईट शक्तींना संतुष्ट करण्यासाठी दिला जाणारा बळी असतो. आता ही प्रथा नाटकात कुणी आणली याला जसा पुरावा नाही तसाच तो “दिवाळी पहाट”ला सजवल्या जाणाऱ्या सेलेब्रिटींच्या आवताणालाही नाही. एकाच्या फेसबुक पोस्टवरुन आठवलं हल्ली म्हणे दोन चार मराठी गीते गाऊन डायरेक्ट हिंदी गीतांवर उड्या मारल्या जातात. वृद्धाश्रमात बहुभाषिक प्रेक्षक म्हणून हिंदी गीते, काही ठिकाणी स्पाॅन्सर अमराठी म्हणून हिंदी गीते, काही ठिकाणी लोकॅलिटी म्हणून हिंदी गीते तर काही ठिकाणी मराठी गायकच नाहीत म्हणून आॅर्केस्ट्रा संस्कृती चेकाळत चाललीय. “ओ थर्टीफर्स्ट में कैसा मिडनाईट में गानाबजाना चलता है, वैसा ही दिवालीमें सुबह का आॅर्केस्ट्रा बहूत चलता है” म्हणत नवे प्रोड्युसर उभे राहताहेत… आणि एकदा काही दिवाळी पहाट “नयी सोच” असलेल्या निर्मात्यांच्या हातात गेली की, त्याचा थर्टी फर्स्ट सारखा इव्हेंट झालाच म्हणून समजा…!