राज चिंचणकर
रंगभूमीवर अनेकविध नाट्यकृती येत असतात आणि त्यातल्या काही नाट्यकृती बराच काळ रंगभूमीवर टिकून राहिलेल्या दिसतात. सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘अमेरिकन अल्बम’ या बहुचर्चित नाटकाला, तर रंगभूमीवर येऊन आता एक वर्ष होत आहे. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी या नाटकाचा मुंबईतला शुभारंभाचा प्रयोग रंगला होता आणि यंदाच्या दिवाळीत या नाटकाच्या टीमला वर्षपूर्तीचा गोडवा अनुभवायला मिळत आहे. ‘रसिकमोहिनी’ नाट्यसंस्थेच्या भाग्यश्री देसाई यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, लवकरच या नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे.
नात्यांमधल्या भावविश्वाचा ठेवा जतन करणारा हा अल्बम असून, मुंबई आणि शिकागो या शहरांना विविध स्तरांवर एकत्र आणण्याचे काम या नाटकाने केले आहे. या नाटकासाठी दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना आणि वेशभूषा अशी पंचरंगी कामगिरी पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांभाळली आहे. ‘रसिकमोहिनी’ आणि ‘एफ. एफ. टी. जी.’ निर्मित या नाटकात दीपक करंजीकर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, अमृता पटवर्धन, भाग्यश्री देसाई आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका रंगवल्या आहेत. आतापर्यंत या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग झाले आहेत. नाटकाच्या वर्षपूर्तीचा योग साधून भाग्यश्री देसाई यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणतात, “एक निर्माती आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी हा प्रवास खूप आनंददायी होता. ज्येष्ठ रंगकर्मी आशा काळे यांनी स्वतः संहितेची पूजा करून या नाटकाचा मूहूर्त केला होता. पुरुषोत्तम बेर्डे सरांसारख्या हरहुन्नरी व दिग्गज दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करता आल्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. दीपक करंजीकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख या निमित्ताने झाली.
त्यांची पुस्तके, भाषणे, अभिनय सर्वच अचंबित करणारे आहे. मोनिकाचा एकपात्री अभिनय पाहिलेला होता; त्यामुळे तिचे पहिलेच नाटक असूनही ती चांगले काम करेल याची खात्री होती. अनेक नाटकांत एकत्र काम केले असल्याने आशुतोष नेर्लेकर यांच्या सहकार्याबद्दलही खात्री होती.अमृता आमच्यासाठी एक सरप्राईज पॅकेज ठरली. नाटकात नंतर मेधाची आणि रूपालीची एन्ट्री झाली. त्यांनीही उत्साहाने व आपापल्या पद्धतीने नाटकातली मेघा फडणवीस साकारली. आमच्या पडद्यामागच्या कलाकारांचे सहकार्य आणि उत्साहही वाखाणण्याजोगा आहे. आमचे सहनिर्माते झरीर इराणी व मोहनदास प्रभू हे दोघेही अतिशय सहकार्य करणारे आहेत. सकारात्मक शब्दांत ते आम्हाला कायम प्रोत्साहन देत असतात. त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”