लता गुठे
सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य देणारी ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी साजरी होते. फक्त भारतातच नव्हे तर जगभर अनेक ठिकाणी दिवाळीचा सण साजरा करतात. हिंदू धर्मातील हा पाच दिवसांचा सण. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असल्यामुळे या पाच दिवसांमध्ये हा आनंदोत्सव आपण साजरा करतो. संत जनाबाईच्या एका अभंगातील काही ओळी मला आवडतात त्या अशा…
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥…संत जनाबाई
जसजशी दिवाळी जवळ येऊ लागते तसतसे दिवाळीचे वेध लागतात. घराघरांत सफाई सुरू होते. खरेदीची गडबड, दिवाळीमध्ये रेलचेल असते ती फराळाची… घराघरांतून वेगवेगळ्या पदार्थांचे सुगंध येऊ लागतात आणि वसुबारसचा दिवस उजाडतो. आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाई यांनी घरे सजली जातात. अंगण सडा रांगोळीने सुशोभित होते. रोषणाईने अवघे त्रिभुवन प्रकाशाने न्हाऊन निघते, जणू चांदण्यांनी लखलखलेले आकाश धरतीवर उतरले आहे असा भास होतो. नक्षत्रांचा सडा पडावा तसे लुकलुकणारे दिवे पाहून मनात चैतन्य निर्माण होते… यावेळेला ज्ञानेश्वर माऊलीची रचना आठवते
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥ …संत ज्ञानेश्वर
म्हणजेच काय तर मनातील अविवेक अज्ञान आणि अहंकाराचा अंदाज विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की, मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते. अशा दिवाळीचा इतिहास महत्त्व समजून घेऊया.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या दिवाळी सणाला जरा समजून घेऊया…दीपावलीचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते असे हेमचंद्राने म्हटले आहे. तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव असल्याचे वाचायला मिळते. तर काही ठिकाणी म्हणजे नीलमत पुराणात दिवाळी या सणास ‘दीपमाला’ असे म्हटले आहे. तर कनोजाचा राजा हर्षवर्धन याने ‘नागानंद’ नाटकात या सणाला ‘दीपप्रतिपदुत्सव’ असे नाव दिले आहे आणि दिवाळी हा शब्द ‘ज्योतिषरत्नमाला’ या ग्रंथात वापरला. दिवाळीला ‘दीपालिका’ असेही म्हटले आहे. तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख ‘सुखरात्री’ असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका’ म्हणून दिवाळी ओळखली जाते.
दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दी’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’ याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना असा अर्थ आहे. दिवाळी या सणाला किमान तीन हजार वर्षे जुनी परंपरा आहे. बदलत्या काळाबरोबर या सणाचे स्वरूपही बदललेले जाणवते. आर्याच्या काळापासून दिवाळीच्या सणाचे संदर्भ मिळतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आले. ते याच दिवसात. अमावस्याची रात्र असल्यामुळे सर्वत्र दिवे लावून आयोध्या नगरी सजवली आणि आनंदोत्सव साजरा केला. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पूर्वीपासून आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे त्या दिवसात घरं धनधान्यांनी भरलेली असतात. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात. दाराला फुलांचे तोरण लावले जाते आणि अशा या पवित्र वातावरणात दिवाळी सण साजरा होतो.
दिवाळी सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत. प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. या पाचही दिवसांचे महत्त्व असे आहे. अश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात असे या सणाचे दिवस असतात. साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी सण येतो.
धनत्रयोदशी : आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. या दिवशी आयुर्वेदाचार्य धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी धनाजी पूजा केली जाते. नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. याचबरोबर काहीजण धणे, गूळ, पैसे लक्ष्मीसमोर ठेवून लक्ष्मीची पूजा करतात.
नरक चतुर्दशी : अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. पहाटे उठून सुवासिक तेल, उटणे लावून अंघोळ केली जाते. मन आणि शरीर शुद्धी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. या दिवसाच्या मागे नरकासूर वधाचीही कथा आहे. या कथेचा सारांश असा आहे की, नरकासूर ज्या राजाला हरवायचा त्या राजाच्या राणीला कैद करून आपल्याकडे ठेवायचा. त्यामुळे श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्यासाठी जाताना सत्यभामेलाही सोबत नेले होते. काही वेळासाठी श्रीकृष्ण हे बेशुद्ध झाले आणि सत्यभामेने नरकासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे.
यानंतर येणाऱ्या लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात जास्त महत्त्वाचा समजला जातो. सर्व स्नेही आप्तेष्टांना शुभेच्छा देऊन फराळाला बोलवले जाते. संध्याकाळी फुलांनी रांगोळीने घर, अंगण सजवून संध्याकाळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची
पूजा करतात.यानंतरचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला. दिवाळीचा पाडवा, या दिवशी नवीन वस्तू, गाडी, दुकान खरेदी करतात किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात या दिवसापासून केली जाते.भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह आपुलकी वाढवणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतात. माहेरी आलेल्या मुलींचा सन्मान केला जातो, अशाप्रकारे दिवाळी हा सण साजरा केला जातो.
भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्मात दिवाळी हा सण थोड्याफार फरकाने साजरा केला जातो,
तो असा…
जैन समाज : अश्विन अमावास्येला जैनांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना ‘निर्वाण लाडूं’चा भोग चढवतात आणि नंतर फटाक्यांची आतषबाजी करतात.
आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंवा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.
बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन
पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.
बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून
दिवे लावतात.
तमिळ समाज : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
अशाप्रकारे दिवाळीचे महत्त्व फक्त खाण्यापिण्याचे नाही तर आरोग्याशी आणि धार्मिक गोष्टीशी आहे.
अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवणारी, अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश पसरविणारी चैतन्यमय दिवाळी. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, आनंद, चांगले आरोग्य घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!