सोलापूर: जुलैपर्यंत उणे पातळीतील उजनी धरण ४ ऑगस्टपूर्वी भरले आणि धरणातून पाणी भीमा नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून द्यावे लागले. मागील दोन महिन्यांत धरणातून तब्बल १०६ टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले आहे. अजूनही उजनीत दौंडवरून २८०० क्युसेकचा विसर्ग सुरू असून, धरण सध्या १११ टक्के भरले आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत विसर्ग बंद झाल्यावर उजनीचे सगळेच दरवाजे पुढे तीन महिन्यांसाठी बंद केले जाणार आहेत.
सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील १३० हून अधिक ग्रामपंचायती, एमआयडीसी व साखर कारखान्यांना आणि दीड लाख हेक्टरला उजनीच्याच पाण्याचा आधार आहे. शेतीशिवाय एकूण ४३ योजना उजनी धरणावर अवलंबून आहेत. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या धरणात १२ महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर जानेवारीअखेर शेतीला पहिले आवर्तन तर मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरवातीला दुसरे आवर्तन आणि मेअखेर गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडले जाऊ शकते. धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होणार असून, समितीची बैठक आता नवीन सरकार सत्तेवर आल्यावर डिसेंबरअखेर होणार आहे.