महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. एक भरधाव टेम्पो आणि दोन दुचाकीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा दुचाकी स्वार जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत वैभव महाडीक (१८) आणि सिध्देश गंगाधर पवार दुचाकीवरून महाड बाजुकडे येत होते. शिंदेकोंड नजिक आले असता मागून येणाऱ्या टेम्पोने प्रथम सिध्देश पवार याच्या दुचाकीला धडक दिली. नंतर वैभव महाडीक याच्या दुचाकीला धडक दिली. या झालेल्या अपघातात दोनही दुचाकीस्वार जखमी झाले होते. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्यातील वैभव महाडीक याचा मृत्यू झाला तर सिध्देश पवार या जखमीला उपचारासाठी दुसरीकडे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघात होताच दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वैभव महाडीकला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वेळेत उपचार न झाल्यामुळे वैभवचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. त्याचबरोबर दोषी असलेल्या डॉटरांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा पंढरीनाथ महाडीक आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी घेतला आहे.