मुंबई :‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सावली म्हणजे प्राप्ती रेडकरने लहानपणीच्या दिवाळीची आठवण सांगितली. “आम्ही आधी चाळीत राहायचो आणि चाळीतले सर्व मित्र-मैत्रिणी एक स्पर्धा लावायचो कि जो दिवाळीच्या दिवशी पहाटे सर्वात पहिला उठेल तो जिंकणार, म्हणजे काही बक्षीस नाही मिळायचे फक्त आनंद मिळायचा. कसं कळायचं तर फटाक्याचा आवाज आला कि समजून जायचे कोणीतरी उठलंय. मी त्या स्पर्धेत ३-४ वेळा जिंकली आहे. ती मज्जाच वेगळी होती. मग सर्वांनी एकत्र फटाके फोडायचे, शेजाऱ्यांकडे फराळही करायला जायचे. चाळीतल्या दिवाळीची मज्जाच वेगळी आहे. आता आम्ही तिथे राहत नाही पण माझी आज्जी तिथेच राहते तर मी तिथे दिवाळी साजरी करायला जाते पण आता तशी मस्ती-मज्जा नाही होत आणि मी ती मज्जा मस्ती खूप मिस करते. माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस होते ते.
दिवाळीमध्ये जो तडतडणारा पाऊस असतो तशी रंगबिरंगी आहे मी, कारण मी फार बडबड करत असते. मी बेसनाच्या लाडवा सारखी आहे. बेसन लाडू खूप जणांना आवडतो तसंच माझं आहे कि जिथे जाते तिथे लोकं माझ्यावर प्रेम करतात. हे मी स्वतःच कौतुक म्हणून सांगत नाही पण असं मी अनुभवलं आहे. आता मी जी मालिका करत आहे ‘सावळ्याची जणू सावली’ तिथे ही मी सर्वांची लाडकी झाली आहे. असा एकही कलाकार नाही जो माझ्याबद्दल वाईट बोलतो. माझ्यासाठी छान खाऊ आणतात, मला गिफ्ट्स ही देतात म्हणून मला वाटत कि मी बेसन लाडू सारखी आहे.”