मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत या मालिकेत आपली लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल. याआधीच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका विजय मिळवला आहे. त्यातच शेवटचा सामना जिंकत टीम इंडिया मुंबईकरांना विजयी गिफ्ट देणार का हे पाहावे लागेल.
गेल्या १२ वर्षांपासून टीम इंडियाने मायभूमीत मालिका गमावली नव्हती. मात्र न्यूझीलंडने त्यांना पराभवाचे पाणी पाजले. भारताच्या स्पिन गोलंदाजांना मदत करणारी पिच बनवण्याचा डाव त्यांच्यावरच उलटला. आता त्यांना पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टिकून राहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात काहीही करून विजय मिळवावाच लागेल.
भारताने आतापर्यंत चार डावांपैकी तीन डावांत ४६, १५६ आणि २४५ धावा केल्या आहेत. यावरून त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी दिसते. दरम्यान, टीम इंडियाला लवकरच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे.