मुंबई : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावाही राऊत यांनी केला. तसेच शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. यावर भाजपाचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रश्मी शुक्ला यांना सचिन वाझे समजता का? त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, असे शरसंधान राणे यांनी राऊतांवर साधले.
निवडणूक पारदर्शकपणे लढवत असाल आणि लोकशाही पद्धतीने काम करत असाल, तर घाबरता कशाला? कर नाही तर डर कशाला? रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर एवढा विरोध का? असा सवाल नीतेश राणे यांनी केला. रश्मी शुक्ला यांच्या नावामुळे राऊतांची झोप उडाली आहे. कुठेही वसुली करायला आणि भ्रष्टाचार करायला राज्याच्या डीजी रश्मी शुक्ला यांना सचिन वाझे समजता का? संजय राऊत यांच्या मनातले काळबेरं बाहेर आले आहे. रश्मी शुक्ला या कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. त्या कोणाच्याही बाजूने पक्षपाती काम करत नाहीत. त्यांच्यावर झालेले आरोप असत्य आहेत आणि त्यांना हटवण्याची मागणी अनावश्यक आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.