मंगला गाडगीळ
वयस्कर ७५ वर्षांचे परांजपे काका आणि ६८ वर्षांच्या काकू बाहेरगावी निघाले होते. बरोबर त्यांचा डॉगी, चिकूही होता. मुले परदेशात, इथे दोघांच्या सोबतीला डॉगी, चिकू. वर्षाचा दिवाळीचा सण घरी साजरा करायचा सोडून कुठे निघालात असे विचारल्यावर म्हणाले की, दिवाळी आम्ही बाहेर आमच्या गावी कोकणात साजरी करतो. इथे फटाक्यांच्या आवाजाचा आणि धुराचा फार त्रास होतो. आमचा चिकू तर दिवाळीचे चार दिवस पलंगाखालून बाहेरच येत नाहीत. फटाक्यांच्या आवाजाला तो फार घाबरतो. दिवाळीत फटाक्यांचा आवाज आणि धूर यांचा केवळ माणसांना त्रास होत नाही तर आजूबाजूच्या प्राण्यांना सुद्धा त्रास होत असतो. नुसते प्राणीच नाही तर पक्ष्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. असे असेल तर या फटाक्यांची किंमत केवळ रुपयात करून चालणार नाही. ध्वनी आणि वायू प्रदूषण दोन्ही हातात हात घालूनच येतात. काही ठिकाणी वर्षाचे बारा महिने ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास लोकांना सहन करावा लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डोंबिवली येथील मोठा गाव. दिवा-वसई रेल्वे मार्गावर डोंबिवली जवळ एक रेल्वेचे फाटक आहे. रेल्वेचा असा नियम आहे की, तिथून ट्रेन जात असताना एक किलोमीटर अगोदरपासून भोंगा वाजवायला सुरुवात करायची ते गाडीने फाटक पार करेपर्यंत जसजशी या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्या यांची वर्दळ वाढत आहे तसतसा आवाजाचा त्रासही वाढत आहे. फाटक उघडल्यावर प्रत्येकाला लवकर जायचे असल्याने हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भरच घातली जाते. या शिवाय वायू प्रदूषणाचा त्रास. फाटक बंद असताना त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या असतात. त्यांच्यामुळे कार्बन मोनॉक्साईड आणि इतर प्रदूषण करणारे वायू बाहेर पडत असतात.प्रत्येकाला प्रथम तिथून बाहेर पडायचे असते त्यामुळे हॉर्नचा वापर मुक्तपणे होत असतो. वयोवृद्ध आणि आजारी लोकांना यामुळे किती त्रास होत असेल याची कल्पनाच करवत नाही. अशी परिस्थिती आणखीही बऱ्याच ठिकाणी असते.
ट्रेनच्या बाहेर अशी परिस्थिती तर आतमध्ये वेगळीच परिस्थिती. लोकल ट्रेनमध्ये प्रवास सुखकर असेल अशी आशा बाळगावी तर तिथेही शांती नाही. पुढील स्टेशनची घोषणा होण्याअगोदर किंवा नंतर मोठ्या आवाजात जाहिरात सुरू होते. आवाज कमी करा सांगितले तर सांगतात ‘व्हॉल्युम कंट्रोल’ आमच्या हातात नाही. सिस्टीमने तो सुधारायला हवा. जी कथा लोकल ट्रेनची तीच मेट्रो रेल्वेची सुद्धा. तिथेही हाच प्रकार आढळतो. पुणेकर मंडळी तर मोठा आवाज आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला खूपच कंटाळली आहेत. पुण्यातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. पण त्यावेळी वाजणारे ढोल-ताशे, बँड पथके यांच्या आवाजाने लोक हैराण झाले आहेत. लोकांनी या बाबतीत आपल्या उत्साहाला थोडी वेसण घालायला हवी. ज्या गणेशोत्सव मंडळांनी नियम मोडला त्यांच्यावर गेल्या पाच वर्षांत शंभरावर तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या बाबतीत उच्च न्यायालयाने नियम घालून दिलेले आहेत. ते मोडल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि पाच वर्षांपर्यंत कैद अशी तरतूद आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार लोकांना नियम दाखवण्यापेक्षा त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा योग्य मार्ग आहे. आम्ही प्रयत्न करतो पण ढोल ताशा पथके आणि त्यांच्या पुढे नाचणाऱ्या लोकांच्या उत्साहाच्या उकळ्यांना त्यांनी स्वतःच थोडे थंड करायला हवे.
घराच्या जवळ मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्यामुळे लोकांना फार त्रास होतो. ज्येष्ठ नागरिकांची चिडचिड होते. काहींच्या छातीत धडधडते. झोप पूर्ण होत नाही त्यामुळे नाडीचे ठोके जोरात पडायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे परांजपे काकांसारख्या व्यक्ती शहराबाहेर निघून जातात. ज्यांना ते शक्य नसते ते बिचारे दारे खिडक्या बंद करून बसतात. सरकारी नॉइस पॉल्यूशन (रेगुलेशन अँड कंट्रोल) नियमांनुसार लोकवस्तीमध्ये दिवसा आवाजाची पातळी ५० डेसिबल तर रात्री ती ४० डेसिबल असायला हवी. उच्च न्यायालयाने आवाजाच्या प्रदूषणाबाबत काटेकोरपणे नियम पाळले जावेत असे म्हटले आहे. लोकांना आवाजाचा त्रास झाल्यास पोलिसांकडे ११२ या नंबरवर तक्रारी कराव्या असे पोलीस सांगतात.या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने काही सूचना जारी केल्या आहेत.नागरिकांनी दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीनेसाजरी करावी.फटाके १० वाजेपर्यंतच वाजवावे. ते सुद्धा शक्यतोवर आवाजविरहित शोभेचे असावेत.
फटाके फोडताना अरुंद गल्लीत, घराजवळ न फोडता मोकळ्या मैदानावर फोडावे. फटाके फोडताना बरोबर कोणीतरी मोठे माणूस असावे.अपघात होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून जवळ पाण्याने भरलेली बादली आणि वाळू असावी.
फटाके फोडताना अंगात सुटी कपडे असावेत. ग्राहक स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणाच्या हक्कावर दावा करत आहेत. असे असले तरी त्यात हक्कांपेक्षा कर्तव्याचा भाग जास्त आहे. त्यामुळे ही दिवाळी आपणा सर्वांना सुख- समृद्धीबरोबरच शांतीमय जावो ही सदिच्छा.