उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडोबांनी डोके वर काढल्याने दोन्ही बाजूंकडील दिग्गज नेते मंडळी ऐन दिवाळीत त्यांना थंड करण्याच्या मोहिमेवर आहेत. अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे सुरू असलेले हे घमासान आता पुढील चार दिवस कायम राहणार असून, नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आम्ही कामाला लागलो असून, महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला. तसेच महायुतीत एकमेकांविरोधात काही ठिकाणी क्रॉस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझी संयुक्त बैठक झाली. एकमेकांविरोधातील अर्ज हे मागे घेण्यात येणार आहेत. काही ठिकाणी बंडखोरी आहे. महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच बंडखोरी केलेले लोक आमचेचे आहेत. त्यांची समजूत काढण्यात आम्हाला नक्की यश येईल. रोष मोठा असतो पण पक्षाचे व्यापक हित ठेऊन अनेकांनी माघार घेण्याची मानसिकता झाली आहे. भाजपा हा पक्ष संघटनेच्या आधारावर, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. संघटना आणि कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गोपाळ शेट्टींच्या घरी विनोद तावडेंची भेट
दरम्यान, बोरिवली मतदारसंघातून बंडखोरी केलेले गोपाळ शेट्टी यांची विनोद तावडे यांनी घरी जाऊन भेट घेतल्याचे समजते. तसेच शेट्टी हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांची समजूत काढू. माहीममधील शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी अशी एकत्र बोलणी सुरू असून, नक्की मार्ग काढू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.