Friday, July 4, 2025

Government Job : पालिकेच्या नोकरीला ७१ जणांनी केला रामराम!

Government Job : पालिकेच्या नोकरीला ७१ जणांनी केला रामराम!

पुणे : सरकारी कामाची बदलती पद्धती, कामाचा व्याप, काम करताना होणारा मानसिक त्रास यामुळे गेल्या वर्षभरात ७१ जणांनी पालिकेच्या नोकरीला रामराम ठोकल्याचे समोर आले आहे. तर, पालिकेत कायमस्वरूपी असलेल्या १३ कर्मचाऱ्यांनी निवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी पालिकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून इतर ठिकाणी चांगल्या पदावर संधी मिळाल्याने त्यांनी पालिकेची सेवा सोडली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.


पुणे महापालिकेत नोकरभरतीचा वाद न्यायालयात असल्याने, तसेच पालिकेची सेवा प्रवेश नियमावलीला अंतिम मान्यता न मिळाल्याने गेली दहा ते बारा वर्षे पालिकेत कोणत्याही पदावर भरती झालेली नव्हती. गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये पालिकेतून अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मात्र, भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने पालिकेने कंत्राटी पद्धतीने पदे भरून कामे सुरू ठेवली होती.


राज्य सरकारने नोकरभरतीवरील स्थगिती उठविल्याने २०२२ मध्ये पुणे महापालिकेने १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांसाठी ४४८ जणांची भरती प्रक्रिया राबविली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३२० जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. या दोन टप्प्यांत आत्तापर्यंत पालिकेने सुमारे ८०८ पदांची भरती केली आहे. यातील लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, सहायक अतिक्रमण निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य काही पदांवरील ७१ जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या जागा रिक्त झाल्या आहेत.


पालिकेत काम करताना होणारा त्रास, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडून टाकला जाणारा दबाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक त्रास यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करून राजीनामे देण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. मात्र, हे कर्मचारी स्पर्धा परीक्षा देऊन पालिकेच्या सेवेत दाखल झाले होते. त्यांना इतर काही ठिकाणांवरून पालिकेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे पालिकेच्या प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment