ऋतुजा केळकर
“उदी आणि दक्षिणे वीन…
निरर्थक विवेक…
माहेरास जाता जाता…
देहाची होते राख…”
हे लिहिता लिहिता माझे हात तिथेच अडले. खरोखरच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले आपण एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. कुठल्याही मठात मंदिरात आपण गेलो की, आपण तिकडची उदी ही भक्तिभावाने आपल्या कपाळी धारण करतो आणि दक्षिणा देखील ठेवतो नाही का…? पण “उदी’’ म्हणजे नक्की काय…? “उदी’’ म्हणजे देखील शेवटी राखच नाही का…? फक्त स्थान बदलले की, त्या वस्तूंचे महत्त्वही बदलते. आता मातीचे भांडेच पहा ना… त्यात पाणी भरून ठेवले की, त्याचा ‘माठ’ होतो… तेच जर देवीच्या पूजेत धान्य पेरून ठेवले, तर त्याचा ‘घट’ होतो… पण तेच जर अग्नी ठेऊन प्रेताजवळ ठेवले तर त्याचे…‘मडके’ होते… मातीचे भांडे तेच, पण स्थान बदललं आणि त्याचा वापर तसेच त्याचे महत्त्व आणि व्याख्याही बदलते. आपण काळे असू किंवा गोरे. कुरूप असू किंवा देखणे. कायमच आपण आपल्या शरीरावर प्रचंड प्रेम करतोच करतो. पण एक गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही धर्म कोणताही असो म्हणजे, तुम्हाला मृत्यूनंतर जाळले काय किंवा पुरले काय त्याची अखेरीस माती किंवा राखच होते. हे वास्तव नाकारता येणार नाही.
कसे आहे ना की, ‘भगवद्गीता’ असो ‘बायबल’ असो अगदी ‘कुराण’ असो… जगातील सर्वच मौल्यवान ग्रंथातून आपण आपल्या जीवन मुल्यांचा शोध घेत असतो. मी तर म्हणेन आपण कायमच ज्ञानाचा एक-एक कण शोधताना दत्त गुरूंसारखे चौकस व्हायला हवे. गुरूदेवांनी चोवीस गुरू केले तेही निसर्गातूनच. मी हिंदू आहे म्हणून मी फक्त गीताच वाचेन किंवा मी मुसलमान आहे म्हणून मी फक्त मुस्लीम ग्रंथाचेच पठण करेन… असे नसते. कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही धर्म हा अनुचित गोष्टी शिकवतचं नाही. असे म्हणतात की, हंस आणि बगळे हे मानसरोवर एकत्र राहतात. पण हंस हे फक्त मोत्यांचाच चारा टिपतात, तर बगळे हे कायम मासेच खातात. तुम्हा साऱ्यांच्याच दृष्टीला उत्तम आणि अधम यांना पारखण्याची विवेचक बुद्धी अंगिकारता आली पाहिजे आणि त्या बुद्धीचा वापर करताना स्वकौशल्याचा पुरेपूर उपयोग करता यायला हवा. कल्पनेवर कुणाचाही मालकी हक्क नसतो. आज जगात घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या-मोठ्या गोष्टींची सुरुवात ही छोट्याशा कल्पनेतूनच झाली आहे.
मला मान्य आहे की, अक्षर एकच असते पण त्याच्यापासून निर्माण होणारे शब्द हे वेगवेगळे असतात. जसा त्या शब्दांत वेगवेगळेपणा असतो तसतसा त्याचा अर्थही वेगवेगळा होतो. आता पहा, नागर भाषेत ‘गाढव’ या शब्दाचा अर्थ साऱ्यांचीच… सर्व प्रकारची ओझी निमुटपणे वाहून नेणारा एक निरुपद्रवी पण अत्यंत उपयुक्त असा प्राणी असाही होतो आणि दुसरीकडे ‘गाढव’ म्हणजे ‘मुर्खशिरोमणी’ असाही अर्थ होतोच की. स्थळ, काळ आणि वेळ तसेच शब्दोच्चार हे बदलले की, त्या शब्दाचा अर्थ बदलतोच बदलतो म्हणूनच, आपण आपले भाष्य… उच्चार… तसेच आपली वाणी ही नेहमीच जपावी, कारण जगात ‘ध’ चा ‘मा’ करणारी जशी आनंदीबाई आहे तशीच नेसत्या वधूवस्त्राची पर्वा न करता भळभळणाऱ्या जखमेवर चिंधी बांधणारी द्रौपदी देखील आहे. इतिहास असो अगर वर्तमान, पुस्तक असो अगर ग्रंथ. दृष्टी बदलली की, अर्थ बदलतो. अगदी माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर,
“द्रौपदी ही माता…
कुंती ही माता…
पण…
एक वीर माता…
तर दुजीला स्वार्थी गणता…