मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी सांगितले की, महायुती टीमवर्क करतेय, आम्ही केलेलं काम आणि महाविकास आघाडीच्या सरकारचे काम, यांची तुलना झाल्यास महायुतीच पुढे येईल.
शिंदेंनी सांगितलं की, त्यांच्या सरकारने तीन वर्षांतील कामांचा अहवाल सादर केला आहे, त्यासाठी धाडस व हिंमत लागते, आम्ही रिपोर्ट कार्ड पण दाखवले. इलाका कोणाचाही असला तरी धमाका आम्हीच करणार, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. तसेच महायुती सरकारचे कामकाज जनतेपर्यंत पोहोचले असून त्याची दखल बहीणी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व कामगार घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि २०२९ मध्ये मनसेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद मिळवेल असे भाकीत केले आहे. त्यावर शिंदेंनी कोणतेही थेट विधान न करता महायुतीच्या कार्यक्षमतेवर भर दिला.