Tuesday, December 10, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमैत्रीपूर्ण लढतीची आघाडी अन् मैत्री धर्माची महायुती...!

मैत्रीपूर्ण लढतीची आघाडी अन् मैत्री धर्माची महायुती…!

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण कसं आणि किती ढवळून निघालयं हे उभा महाराष्ट्र पाहतोय. सर्वांचेच अंदाज चुकवणार असं राजकारण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. निवडून येणं या निकषावरची ही निवडणूक आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय रामदास आठवले, रासप अशी महायुती आणि राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट असा हा महाराष्ट्रात राजकीय लढतीचा सामना होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी तसेच तिसरी आघाडी अशी ही स्वतंत्रपणे राज्यातील लढत पाहायला मिळेल. आणखी चार दिवसांनी ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मार्ग घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लढती कशा होणार कोण उमेदवारी अर्ज ठेवणार आणि कोण माघार घेणार हे समजणारे आहे. होत असलेल्या या राजकीय ध्रुवीकरणामध्ये पक्षांचे आणि विचारांचे अस्तित्व देखील निश्चित होणार आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून जो डंका तथाकथित मंडळींकडून सतत गजर केला जातो, त्याचा विचार करताना डावी आणि उजवी विचारसरणी त्यातली ही वैचारिक राजकीय लढाई या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे. यामध्ये कोणीही कितीही पदरा आडून डावी विचारसरणी आणि उजवी विचारधारा यांचे पुरस्कर्ते निश्चित झालेले आहेत. हे आता उघड सत्य आहे.राज्याच्या राजकारणामधील एका वेगळ्या वातावरणात ही निवडणूक पार पडत आहे. महाविकास आघाडीत गेल्या आठवड्यात जागा वाटपाचा तिढा सुटला म्हणून जाहीर करण्यात आले. पहिले ८५-८५-८५ नंतर ९०-९०-९० फॉम्युला ठरल्याचे जाहीर केले; परंतु यातला कुठलाच फॉर्म्युला ठरला नव्हता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हेच सातत्याने महाविकास आघाडी किती घट्ट आहे तो फेव्हिकॉलचा कसा घट्ट जोड आहे हे सांगत असत; परंतु हा जोड घट्ट नव्हताच मुळी हे पुढच्या एक दिवसातच जनतेसमोर आले. राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या उद्धव ठाकरे शिवसेना काहीही नसतानाही काँग्रेसमुळे त्यांना फायदा होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वत:च्या निवडून येणाऱ्या जागांवर उमेदवार जाहीर करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची गोची केली आहे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी फार चर्चा न करता अत्यंत धूर्त खेळी करत स्वत:च्या पक्षाचे उमेदवार फार पद्धतशीरपणे निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. एकिकडे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्याशी चर्चा करीत असतानाच समाजवादी पक्षाचा उमेदवार फहाद अहमद आपल्याकडे घेत त्यांचीच उमेदवारी जाहीर केली.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही उद्धव ठाकरे शिवसेनेची वाट न पाहता आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीमध्ये परस्परातील अविश्वासाची दरी वाढत केली ही अविश्वासाची दरी रूंदावत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडुनही नेहमीप्रमाणे कुरघोडीचे राजकारण करण्यात आले. मनाला वाटेल त्याप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. कोकणात तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या निवडणुकीत महाविकास आघाडीतून पूर्णपणे नामशेष करण्यात आला आहे. कोकणातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळेल त्यांना पक्षकामाची ऊर्जा वाढेल अशी कोणतीही स्थिती नसल्याने साहजिकच पक्षातील कार्यकर्ते आपण फक्त पालखीचे भोई बनून राहायचे काय या प्रश्नार्थक चेहऱ्याने वावरताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना फार पद्धतशीरपणे नियोजन करून केव्हाचेच चेकमेट केले आहे. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांसोबतच अशी ही बनवाबनवीचा फार मोठा खेळ खेळण्यात आला आहे. एकिकडे महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढतीचा फॉर्म्युला अमलात आणला जात असताना मात्र महायुतीकडुन युतीचे मित्रपक्ष असलेल्यांनाही जागावाटप करताना बडनेरमध्ये रवी राणा, गंगाखेडमध्ये रासप-रत्नागर गुट्टे, कलिना मतदारसंघात आरपीआय आठवले गट पाठिंबा तर शाहूवाडीत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे महायुतीतील मित्रपक्षाशी मैत्रीधर्म भारतीय जनता पक्षाने पाळला आहे. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच कोकणचे राजकारणही पूर्णपणे ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त कोकण महायुतीच्या पूर्ण पाठीशी राहिले होते. विधानसभा निवडणुकीत यात कोणताही बदल घडताना दिसणार नाही अशीच स्थिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -