विलास खानोलकर
श्रीस्वामी समर्थ एकदा चोळाप्पा, श्रीपाद भट व अन्य सेवेकऱ्यांसह धाकट्या मणूर गावी आले. भीमा नदीस मोठा पूर आला होता. चोळाप्पा म्हणाला,‘महाराज, येथे भोजनाची काहीच तयारी नाही. काय करावे?’ समर्थ म्हणाले,‘पलीकडे जायचे होते, पण भीमेस महापूर आला आहे. बरे नौकाही पलीकडच्या तीरी आहे. पलीकडे जाऊन नौका आणतो कोण?’ चोळाप्पा म्हणाला, ‘सांगाती भोपळे नाहीत, नौकेशिवाय पुरात उडी घालणे म्हणजे प्राण देणे?’समर्थ हसून म्हणले, ‘जर आमचा लठ्ठेश्वर (श्रीपाद भट) पंडित जाईल, तर नौका अवश्य घेऊन येईल.’ श्रीपाद भटाने गुरूआज्ञा प्रमाण समजून, समर्थ नामाचा जयजयकार करीत त्या भयंकर महापुरात उडी मारली. सर्व सेवेकरी घाबरून समर्थांस म्हणू लागले, महाराज श्रीपाद भटाचे रक्षण करा. महाराज म्हणाले, ‘मरतो कशाने? आता नौका घेऊन येईल पाहा.’ श्रीपाद भटाने नामस्मरण करीत नदीच्या पलीकडे जाऊन नौका आणली. नंतर समर्थांसह सर्व मंडळी पलीकडे थोरल्या मणूरास गेली.
अर्थ : श्री स्वामी समर्थांसोबत असताना नदीला आलेल्या पुराचेच काय, पण प्रत्यक्ष कळीकाळाचेही भय बाळगण्याचे कारण नव्हते. बाळाप्पासह अन्य सेवेकऱ्यांनी पलीकडे जाऊन नौका आणण्याची असमर्थता दाखविली.
चोळाप्पाचे उद्गार म्हणजे न जाण्याविषयी सबब आहे. श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त मानल्या गेलेल्यांची ही स्थिती, तर तुमच्या आमच्यासारख्यांबद्दल न लिहिणेच योग्य आहे, पण श्री स्वामींना लठ्ठ्याबद्दल (श्रीपाद भट) पूर्ण भरोसा होता. ते सर्वसाक्षी व त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे त्यांना प्रत्येकाची आध्यात्मिक पात्रता ठाऊक होती. म्हणूनच ते हसून म्हणाले, ‘आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल आणि नौका अवश्य घेऊन येईल.’झालेही तसेच श्रीपाद भटाने श्री स्वामींची आज्ञा प्रमाण मानून (खरे तर गुरुआज्ञा ही सर्वश्रेष्ठ असते. एकलव्याने उजव्या हाताचा अंगठा क्षणार्धात कापून दिला. गुरू आज्ञेमुळेच ना?) श्री स्वामी समर्थ नामाचा जयजयकार करीत भीमा नदीच्या महापुरात उडी मारली. श्रीपाद भटाच्या गुरुनिष्ठेची कल्पना नसलेले सेवेकरी मात्र घाबरून श्री स्वामींस श्रीपाद भटाचे रक्षण करण्याबाबत विनवित होते. श्री समर्थांचे भक्कम संरक्षण कवच श्रीपाद भटास असल्यामुळे त्यांनी निक्षून सांगितले, ‘मरतो कशाने? आता नौका घेऊन येईल पाहा.’ आणि झालेही तसेच. सद्गुरू श्रीस्वामी समर्थांच्या शिष्यांवरील गुरुकृपेचे हे उदाहरण आपणास काहीच का प्रबोधित करणार नाही?