सद्गुरू वामनराव पै
धर्माचा संबंध परमेश्वराशी येतो. हा संबंध कसा येतो ते पाहा. मी या आधीही सांगितले होते की, परमेश्वर हा निर्गुण आहे व सगुणही आहे. निर्गुण परमेश्वर हा अव्यक्त आहे. हा अव्यक्त परमेश्वर जेव्हा व्यक्त होतो तेव्हा तो विश्वरूपाने, जगरूपाने प्रगट होतो. हे विश्व निसर्गनियमांनुसार चालते. हे जग प्राणीमात्र, माणसे, डोंगरदऱ्या, नद्या-नाले हा सर्व निसर्ग ए टू झेड निसर्गनियमाने चालतो. जीवनविद्या सांगते की, हे निसर्गनियम म्हणजे परमेश्वराचे अवयव आहेत. तुम्ही निसर्गाचे नियम देवापासून वेगळे करू शकत नाही. म्हणून परमेश्वर व निसर्गाचे नियम एकरूप आहेत, ते परमेश्वरापासून वेगळे करता येत नाहीत असे आम्ही सांगतो. निसर्गनियमांच्याद्वारे आपला परमेश्वराशी थेट संबंध येतो. निसर्गाच्या नियमांना ओळखणे म्हणजे परमेश्वराला ओळखणे. परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही कारण तो दिसण्याचा विषय नाही. कोणी जर सांगत असेल की, मी परमेश्वराला पाहिले, तर तो एक तर लबाड असला पाहिजे किंवा मूर्ख असला पाहिजे. अथवा भ्रमित झालेला असला पाहिजे. मी हवा पाहिली असे जर कोणी सांगत असेल, तर तुम्ही विश्वास ठेवाल? हवा हा पाहण्याचा विषय नाही.
हवा डोळ्यांना दिसत नाही. तुम्हाला आनंद झाला, तर तो आनंद काय तुम्हाला डोळ्यांना दिसतो? आनंद हा दिसण्याचा विषयच नाही. तो चेहऱ्यावरून ओळखता येतो. दुःख डोळ्यांना दिसत नाही पण ते चेहऱ्यावरून कळते. चेहरा पाहून आपण कल्पना करतो की, याला दुःख झालेले आहे. आनंद, दुःख दिसत नाही, भूक लागलेली दिसते का? भूक दिसत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डोळ्यांना दिसत नाहीत. गाणे हा पाहण्याचा विषय नाही ऐकण्याचा विषय आहे. सुगंध हा पाहण्याचा विषय नाही, तर तो नाकाचा विषय आहे. तसाच परमेश्वर हा पाहण्याचा विषय नाही हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे. तो ऐकण्याचा, चाखण्याचा अथवा स्पर्श करण्याचा विषय नाही. तो सर्व ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे. जशी हवा कोणत्याही ज्ञानेंद्रियास आकळता येत नाही तसाच परमेश्वर कुठल्याही ज्ञानेंद्रियास आकळता येत नाही. हवा ही अनुभवायची असते. गुरुत्वाकर्षण शक्ती ही अनुभवायची असते. तिला पाहता येत नाही. फळ खालीच का पडले वर का गेले नाही यावरून गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. सांगायचा मुद्दा हाच की, परमेश्वर हा पाहण्याचा विषय नाही. कुणी जर मी त्याला पाहिला असे म्हणत असाल, तर ते मूर्खपणा अथवा भ्रमिष्टपणा आहे. परमेश्वर व धर्म यांचा संबंध निश्चितच आहे व तो येतो निसर्गनियमांच्याद्वारेच.