प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
तेतील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजाव्यात यासाठी श्रीनिवृत्तीनाथांच्या आज्ञेने माऊलींनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’. हे साक्षात ‘ज्ञान ईश्वरी’ होय. यातील अठराव्या अध्यायात समारोप करताना संतजनांचे, गीतेचे गुणगान माऊली कसे करतात? हे खास ऐकण्याजोगं! आता पाहूया या ओव्या – ‘गीता ही निष्कपट आई असून, मुमुक्षु (मोक्षाची इच्छा करणारे) ही जी तिची लहान पोरे, त्यांची आणि तिची चुकामूक होऊन जी ती सैरावैरा हिंडतात, त्या मायलेकरांची गाठ पाडणे हा तुम्हां संतजनांचा धर्म आहे.’
ही ओवी अशी –
‘गीता निष्कपट गाय।
चुकोनि तान्हें हिंडे जे वाय।
ते मायपूतां भेटी होय।
हा धर्म तुमचा ॥ ओवी क्र. १७८२
माऊली गीतेला म्हणतात, ‘माय’. किती माया, वात्सल्य आहे या शब्दांत! या मायेचे, ममतेचे ठिकाण म्हणजे तिचे बाळ. तेही कसे? तर तान्हे; जे सर्वस्वी तिच्यावर अवलंबून आहे. ‘तान्हे बाळ’ कोणाला म्हटले आहे? भक्तिमार्गातील साधकांना होय. या भक्तांना आत्मज्ञानाची ओढ आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. या जन्माची सफलता ‘आत्मज्ञान’ मिळवण्यात आहे. याचे मार्गदर्शन करण्यासाठी रचलेला ग्रंथ ‘गीता’. म्हणून ती ‘माय’ होय.तान्ह्या बाळाला आईची सोबत सतत हवी असते. पण कधी काय घडतं? हे बाळ नको त्या कारणाने इथे तिथे हिंडते, भटकते. ‘वाय’ हा शब्द त्यासाठी इथे योजला आहे. वाया / कारण नसताना ते हिंडते. अशा बाळाला मग आई केव्हा भेटते असे होते. तिच्याशिवाय ते राहू शकत नाही. तेव्हा कोणी भला माणूस त्या दोघांची गाठभेट घालून देतो.हे सर्व चित्र ज्ञानदेव आपल्यासमोर साकारतात. अगदी असेच घडत आलेले आहे पूर्वापार या संसारात. आपल्या आप्तस्वकियांना समोर पाहून अर्जुनाचे चित्त सैरभैर झाले. तेव्हा श्रीकृष्णांनी उपदेश करून त्याला भानावर आणले. ते हे ‘गीता’ ज्ञान होय.व्यासमुनींनी ते गीतारूपाने सर्व जगासमोर मांडले. संसारात भरकटणाऱ्या जनांना योग्य दिशा मिळावी या हेतूने. हेच ज्ञान (गीता) श्रीनिवृत्तिनाथांच्या आदेशाने, मार्गदर्शनाने ज्ञानदेवांनी मराठीत आणले. ‘ज्ञानेश्वरी’ रूपाने होय. म्हणजे काळ कोणताही असो, पण संतांचे गीताज्ञानाचे, गीतादानाचे कार्य अविरत चालू आहे. हे कार्य निरपेक्षपणे माणसाला त्याची, स्वतःची आणि भोवतालच्या जगाची जाणीव करून देण्याचे आहे. त्यामुळे ‘गीता निष्कपट माय। हा धर्म तुमचा’ ही ज्ञानदेवांची ओवी अगदी सार्थ आहे.
या संपूर्ण भागातून काय जाणवते? ज्ञानदेवांचा ‘गीते’ विषयीचा, व्यासमुनींविषयीचा आदरभाव, संत निवृत्तिनाथ यांच्याविषयीची अपार निष्ठा आणि स्वतःविषयीची विनम्रता होय. (श्रीगुरूंनी माझे निमित्त करून जो ग्रंथ केला, त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण झाले आहे.) (ओवी क्र. १६६५) पुन्हा काव्य म्हणून यातील सुंदरतेविषयी काय बोलावे? गीतेला ‘माय’ म्हणणे, तर साधकांना तान्हे बाळ आणि संतांनी त्या दोघांची गाठ घालून देणं ही सर्व ज्ञानदेवांच्या प्रतिभेची भरारी आहे आणि तीही या भूमीशी जोडलेली!
manisharaorane196@ gmail.com