पुणे : २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयामार्फत दिव्यांग मतदारांसाठी येत्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने दिव्यांगांना मतदान करणे सोपे होणार आहे, असे मत दिव्यांग मतदारांनी व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघामध्ये व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने निगडी येथील व्यापारी संकुलाच्या जवळ झालेल्या दिव्यांग बांधवांच्या बैठकीदरम्यान मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी दिव्यांग व्यक्तींनी आपली मते मांडली, या मतदान जनजागृती कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी शरद पाटील, सहाय्यक नोडल अधिकारी उमा दरवेश, बालाजी गिते, विशाल गायकवाड, प्रतिक लोखंडे, तसेच स्वीप विभागाचे राजेंद्र कानगुडे, दिनेश जगताप, संदीप सोनवणे, महालिंग मुळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, महिला अध्यक्ष संगीता जोशी,भारतातील पहिले सनदी लेखापाल भूषण तोष्णीवाल, राजेंद्र वाघचौरे, रमेश पिसे आणि दिव्यांग मतदार उपस्थित होते.
बैठकीमध्ये सर्वप्रथम दिव्यांग बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.