दिवाळीत, कोणत्याही सणाला सिग्नलला उभी असलेली एखादी नवीन कोरी गाडी पाहिली की त्यांना पाहून आपण नाराज होतो. पण कुबड्यांचा आधार घेवून त्याच गाडी समोर भीक मागणारा भिकारी पाहून आपण स्वतःला खूप भाग्यवान समजायला हवं. ते आपण करतो का? असे पावलोपावली समाजात खूप विरोधाभास आहेत जे आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपल्या अपेक्षा आणि समाधानी वृत्ती यांचा ताळमेळ घालता आला तर आपल्यापेक्षा नशीबवान कोणीच नाही हे लक्षात येईल. त्यामुळे या दिवाळीत स्वतःला जे आहे, जे मिळत आहे त्यात सुखी समाधानी आनंदी समजून आलेलनया लक्ष्मीच स्वागत करा.पुढे जाण्यासाठी प्रामाणिक पणा, मेहनत, सातत्याने प्रयत्न याशिवाय पर्याय नाही. खोटं बोलून, कोणाला फसवून, भ्रष्टाचार करून, चुकीची कामं करून, गैर व्यवहार, गैर वर्तन करून, कोणाशी वाईट वागून पैसा नक्कीच मिळतो पण त्या पैशात आनंद,सुख-समाधान, शांती विकत घेता येत नाही. त्यामुळे आपले काम, आपले घर, कुटुंबातील माणसं यांना सांभाळा म्हणजे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल यात शंकाच नाही.
मीनाक्षी जगदाळे
दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपल्या सर्वांचा आनंदाचा, महत्त्वाचा, उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी आली आहे. घरोघरी दिवाळीची तयारी, खरेदी, लगबग, फराळ, घराची सजावट, फिरायला जाण्याचे नियोजन सुरू आहे. समाज माध्यमातून अनेक जाहिराती, फोटो, व्हीडिओ, सर्व प्रकारची उत्पादने, कपडे, खाद्य पदार्थांचे फोटो यांचा महापूर वाहतो आहे. कोणी स्वतःचं हक्काचं नवीन घर घेतलं आहे, कोणी मोठी गाडी तर कोणी दुकान घेतलं आहे. कोणी नवीन ऑफिस सुरू केलं आहे. कोणी फॅमिलीसोबत भारतात किंवा भारताबाहेर फिरायला जात आहे, कुठे दागदागिने, सोने-चांदीची खरेदी सुरू आहे तर कुठे कोणी घरी नवीन मोबाईल, फ्रीज, टीव्ही यांसारख्या ब्रँडेड इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू घेतल्या आहेत. कोणी जागा, जमिनी घेतल्यात तर कोणी स्वतःचे उत्तुंग बंगले बांधून त्यात गृहप्रवेश करत आहेत. प्रत्येक रस्त्यावर, दुकानात, मॉलमध्ये खरेदीसाठी गर्दी ओसंडून वाहते आहे. ऑनलाईन बाजारात पण मोठी उलाढाल सुरू आहे. हे सगळं आपल्या आजूबाजूला होत असताना अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत अनेकांना वाटतं मी नाही घेऊ शकत, मी नाही करू शकत, माझी ऐपत नाही, माझं बजेट नाही. एखादी गृहिणी, पत्नी नवऱ्याने या दिवाळीत तरी आपल्याला छोटासा दागिना करावा म्हणून हट्ट धरून बसली असेल. एखादा मुलगा वडिलांनी आपल्याला नवीन मोबाईल किंवा गाडी घ्यायला हवी म्हणून नाराज असेल. एखादी बहीण भावाने या भाऊबीजेला तरी भारी साडी घ्यावी म्हणून आस लावून असेल, तर कोणाचे म्हातारे आई-वडील मुलगा आपल्याला कपडे करेल दिवाळीत म्हणून अपेक्षा ठेवून असतील. प्रत्येक जीव छोट्यापासून ते वयोवृद्धांपर्यंत आपल्यासाठी कोणी काही करावं यासाठी आसूसलेला असतो. मित्राला वाटतं असेल मैत्रिणींनी छान गिफ्ट द्यावं, गर्ल फ्रेंडला वाटतं असेल या दिवाळीत माझ्या बॉयफ्रेंडने फक्त ग्रीटिंग न देता काहीतरी चांगली वस्तू गिफ्ट करावी. रिलेशनशिपमध्ये असलेले सुद्धा दिवाळीत एकमेकांना कसं खूश करायचं, किती महागडा, वेगळं काहीतरी घेऊन द्यायचे याचे नियोजन करत असतीलच.
महिलांना तर सणवार खरेदीचा अमाप उत्साह असतो आणि तो हवा. पण कारण ती शेवटी गृहलक्ष्मी आहे. घरातील लक्ष्मी समाधानी आणि सुखी असेल तर त्या घरात कशाला कमी पडत नाही ते उगाच म्हणत नाहीत. घरातील, प्रपंचांतील जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना तिलाही वाटणार मला वैयक्तिक काय मिळालं? दिवस-रात्र कामं करणारी घर आणि बाहेरच्या आघाड्या सांभाळणारी महिला दिवाळीत हक्काने नवऱ्याकडून स्वतःसाठी थोड्या फार खर्चाची काही अपेक्षा ठेवत असेल, तर त्यात चुकीचं काहीच नाही. कोणी करोडो रुपयांत दिवाळी करतं तर कोणी अगदी चार आकडी पगाराच्या बोनसच्या रकमेतून पण करतात. आपली परिस्थिती, आपल्या समोरील अन्य जबाबदाऱ्या, अन्य समस्या, इतर खर्च सर्व लक्षात घेऊन दिवाळीच नियोजन घरोघरी केलं जातं. कशात काही उणीव राहू न देता पण कमीत कमी खर्चात सगळेच सणवार करता येतात आणि ते तसेच करणं अपेक्षित असतं. त्यामुळे खूप दिखावा, बडेजावं केला म्हणजेच सण साजरा झाला असं मुळीच नाही. आजकाल सामाजिक माध्यमातून सतत एकमेकांना पाहताना, विविध अॅप्लिकेशनमधून टाकले जाणारे व्हीडिओ, फोटो, स्टेट्स आपल्याला आपले शेजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, ओळखीचे काय काय नवीन घेतले आहे, कोणते कपडे घातले आहे, कुठे फिरायला गेले आहेत हे सर्व माहिती पुरवत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज आनंदी आनंद असल्यासारखं लोकं रोज स्वतःच सर्व सोशल मीडियामधून अपडेट करत असतात. हे पाहताना कळत-नकळत आपल्या मनात तुलना सुरू होते आणि आपण स्वतःला कमी लेखू लागतो. अगदी साड्यांच्या दुकानात गेल्यावर पण जेव्हा सेल्समन बजेट विचारतो आणि एका ठरावीक काउंटरला पाठवतो तेव्हा महिलांची एक नजर तरी महागड्या साड्यांच्या काउंटरवर जातेच. आपण त्या काउंटरच्या साड्या कधी घेऊ शकतो? किंवा तिथे खरेदी करणाऱ्या महिला किती भाग्यवान आहेत हा विचार मनात येतो. दिवाळीच्या मुहूर्तावर एक ग्रॅम सोनं घ्यायला आलेलं जोडपं! पण त्यातील महिला इतर काउंटरवरील घसघाशीत दागिने एक चक्कर मारून पाहून येतेच. पुढील दिवाळीत हे नक्की घ्यायचं म्हणून मनात दृढ निश्चय करते. लहान मुलं फटाके घेताना आणि त्यांना समजावताना आई-वडिलांना नाकी- नऊ येतात पण यावेळी जाणवत की जिथे आपण आपल्या भावनांना आवर घालू शकत नाही तिथे या लहानग्यांकडून कशा अपेक्षा करणार.
आता हे सर्व पाहत असताना कोणाची प्रगती, उत्तुंग भरारी, मारेमाप पैसा असलेली कुटुंबच समाजात आहेत मग आपण कुठे आहोत? आपण मागे का आहोत? आपलंच नशीब असं का आहे? आपण कुठे कमी पडलो? आपणच कायम मनाला मुरड घातली? यावर विचार करून जे काही आहे त्याचा आनंद पण आपण घेऊ शकत नाही. आपण फक्त आनंद, उत्सव, उत्साह, खर्च हेच पाहून इतकं भारावून जातो की दिवाळीची नाही तर आयुष्याची दुसरी बाजू पाहायला आपण विसरतो. परदेशात सहलीला नेणारा एखादीचा नवरा, दागिने घेऊन देणारा एखादीचा भाऊ, महागड्या साड्या घेऊन देणारे सासरचे सगळ्यांनाच मिळतील असं नाही. आपला नवरा आपल्याला प्रेमाने शेजारच्या गावातील देव दर्शनाला जरी मनोभावे नेत असेल तर त्यात सुख मानता आलं पाहिजे आणि भावाने ताटात अकरा रुपये ओवाळणी टाकली तरी त्याचा मान ठेवता आला पाहिजे इतकं आपल्याला स्वतःला सावरणे जमलं तर आयुष्य आनंदी होईल. आपल्याला जीव लावणारी, प्रेम करणारी, एकनिष्ठ असलेली, आपल्याबद्दल अजिबात चुकीचं न वागणारी बोलणारी मित्र मंडळी, सांभाळणारी माणसं, आपलं कुटुंब दिवाळीत आपल्यासोबत आहेत हेच परमेश्वराने आपल्याला दिलेलं खूप मोठं गिफ्ट आहे हे समजून घेता आलं पाहिजे. या दिवाळीत हे समजावून घ्यायचं असेल तर समाजाची दुसरी बाजू पण प्रत्यक्ष डोळ्यांनी, स्वतः जवळून बघणं खूप आवश्यक आहे. आनंदी दिसणारी, श्रीमंत, संपन्न, समृद्ध, प्रगतिशील लोकं बघून स्वतःचा जीव जाळत असताना, दुसरीकडे अशीही लोकं आहेत ज्यांच्याकडे जे आपण उपभोगत आहोत ते सुद्धा उपलब्ध नाहीये. वृद्धाश्रमात राहणारे, दवाखान्यात गंभीर आजाराशी झुंझणारे, बेडला खिळलेले, अंध, अपंग, मनोरुग्ण, मानसिक, शारीरिक, विकलांग यांची दिवाळी कशी असते? हे प्रश्न स्वतःला विचारा. याही पलीकडे अनाथ निराधार मुलं, रस्त्यावर राहणारे भिकारी, कैदी यांची दिवाळी कशी असते? हे प्रश्न स्वतःला विचारा.
याही पलीकडे अशा अनेक महिला ज्यांना हट्ट करायला नवराच नाही, घटस्फोटित, विधवा, अविवाहित त्यांच्या भावना काय असतील? ज्या वर्षानुवर्षे एकट्याच दिवाळी साजरी करत आहेत त्यांच्या भावना काय असतील? अशाही महिला ज्यांना ओवाळणी टाकायला भाऊच नाही, असे भाऊ ज्यांना बहिणी नाही किंवा होत्या पण आता त्या या जगात नाहीत. यासारख्या लोकांचा आपण विचार तरी करतो का हे स्वतःला विचारून बघा. समाजातील अत्यंत गोरगरीब ज्यांना राहायला घर नाही, घालायला कपडे नाहीत, दोन वेळचं जेवण नाही त्यांना दिवाळीत कोणत्या यातना होत नसतील का? आपण उरलेलं सुरलेलं एकत्र झालेलं, इकडून तिकडून आलेलं शिळे फराळ, पदार्थ देऊन जे लोकं आनंदाने खातात ते त्यावर दिवाळी साजरी करतात. दिवाळीआधी घर आवरताना आपण जे जुने कपडे देतो तेच नवीन समजून घालून जे दिवाळी साजरी करतात, आपण भंगार म्हणून फेकलेल्या वस्तू घरी नेऊन जे संसारात नवीन वस्तू आणली म्हणून खूश होतात त्यांना तीच दिवाळी वाटणार, यांचा विचार आपण करतो का?