तब्बल २५ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार परिसर
उत्तर प्रदेश : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या जानेवारी महिन्यात प्रभु श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. ५०० वर्षानंतर अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरात मोठ्या थाटामाटात दिवाळी (Ayodhya Diwali) साजरी होणार आहे.
अयोध्येमध्ये रामलल्ला यांच्या अभिषेकनंतर पहिल्यांदाच नव्या राम मंदिरात दिवाळी साजरी होणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून शरयू काठी तब्बल २५ लाख दिवे लावले जाणार आहेत. त्याचबरोबर भगवंताचे पुष्पक विमानाने आगमन साकरण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या दिपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हस्ते होणार आहे.
पर्यावरणपूरक फटाक्यांची अतिषबाजी
आज होणाऱ्या दीपोत्सवामध्ये अयोध्येत पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. हे फटाके १२० ते ६०० फूट उंचीवर आकाशात उडणार आहेत. तसेच परिसरातील ५ किमीच्या अंतरावरून ते पाहता येणार आहेत.
शरयू ब्रिजवर आज सायंकाळी फटाक्यासह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने सुरक्षाकर्मचारी तैनात
दिवाळी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची सुरक्षा लक्षात घेता, अयोध्येत सुमारे १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच राममंदिराकडे जाणारे सर्व रस्ते लोकांसाठी बंद करण्यात आले असून केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी या मार्गावर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.