‘शरयू’काठच्या दीपोत्सवाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
अयोध्या : तब्बल २८ लाख विश्वविक्रमी दिव्यांनी उजळलेला शरयू नदीचा काठ, स्वर्गाचा भास निर्माण करणारे दिव्य वातावरण आणि भाविकांची उसळलेली अलोट गर्दी, यामुळे रामनगरी अयोध्या डोळ्यात साठवताना भाविकांच्या मनात “शरयू तिरावरी अयोध्या मनुनिर्मीत नगरी” गीत रुंजी घालत होते. राम मंदिराचा मुस्लिम आक्रमकांकडून झालेल्या विध्वंसानंतर तब्बल ५०० वर्षांनी आज, बुधवारी अयोध्येत खरी दीपावली साजरी झाली.
श्री रामलल्लाच्या अयोध्येत बुधवारी आठवा दीपोत्सव साजरा होत आहे. हा दीपोत्सव यंदा अगदी खास असेल; कारण, येथील भव्य मंदिरात यंदा प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान आहेत. यंदा ५५ घटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार असून, हा एक जागतिक विक्रम ठरेल. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त असून, १० हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. अयोध्येमध्ये यावर्षी ५०० वर्षांनंतर दिवाळी साजरी करण्यात येत आहे. हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. कारण, रामलल्ला यांच्या अभिषेकनंतर पहिल्यांदाच नवीन राम मंदिरात दिवाळी साजरी होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
अयोध्या घाट बुधवारी २८ लाख दिव्यांनी सजवण्यात आला असून, त्यामुळे शहराचे सौदर्य अधिकच खुलले आहे. याघटनेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून अयोध्येत दीपोत्सवादरम्यान किती दिवे लावले जातात, याची नोंद केली जात आहे. यावेळी २५ लाख दिवे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी स्थानिक कारागिरांकडून आदेश देण्यात आले होते. जेणेकरून कोणताही दिवा खराब झाला तरी उद्दिष्ट गाठता येईल.
बुधवारी झालेल्या दीपोत्सवामध्ये अयोध्येत पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. हे फटाके १२० ते ६०० फूट उंचीवर आकाशात उडाले. तसेच परिसरातील ५ किमीच्या अंतरावरून ते सभोवतालच्या रहीवाशांना पाहता आले. शरयू ब्रिजवर संध्याकाळी फटाक्यांसह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले होते.
१० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात
दिवाळी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची सुरक्षा लक्षात घेता, अयोध्येत सुमारे १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. राममंदिराकडे जाणारे सर्व रस्ते लोकांसाठी बंद करण्यात आले असून केवळ पासधारकांनाच प्रवेश देण्यात आला. सुव्यवस्था राखण्यासाठी या मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. अयोध्या परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार म्हणाले की, सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.
हेलिपॅडजवळ उभ्या व्यासपीठावर श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, श्री हनुमान व वशिष्ठ मुनींच्या वेशभूषेतील कलाकारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर रामकथा पार्कमधील व्यासपीठावर ते आसनस्थ झाले. श्री राम-सीता पूजन झाल्यानंतर तेथे प्रतीकात्मक राज्याभिषेक सोहळा पार पडला. सायंकाळी शरयू तीरावर आरती झाल्यावर ‘राम की पैडी’वर शुभमुहूर्तावर दीप प्रज्ज्वलित करण्यात आले.
लेझर शो अन् आतषबाजी
या दीपोत्सवानिमित्त लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरयू तीरावर आकर्षक आतषबाजी करण्यात आली. यात पर्यावरणपूरक आतषबाजीसह डिजिटल आतषबाजीही पाहावयास मिळाली. यंदा प्रथमच नव्या मंदिरात विराजमान प्रभू श्रीराम दीपोत्सवात सहभागी होणार असल्याने अयोध्येतील रहीवाशांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. प्रभू श्रीराम श्रीलंकेमध्ये विजय मिळवून त्रेतायुगात अयोध्येत परतले होते. त्या काळातील आनंदी वातावरण यंदा येथे पाहावयास मिळाले.
५०० वर्षांची प्रतीक्षा संपली : मोदी
प्रभू श्रीराम तेव्हा १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. मात्र, आज सुमारे ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात हजारो दिवे तेवणार आहेत. म्हणून यंदाची ही दिवाळी ऐतिहासिक आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान