नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी कार्यक्रम आयोजित केला. या दरम्यान त्यांनी दिवे लावले. या सोहळ्यास खासदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतीय वंशाचे ६००हून अधिक अमेरिकन नागरिकांनी भाग घेतला.
राष्ट्रपती बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा पुढे चालू ठेवत म्हटले की माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे की राष्ट्रपतींच्या रूपात मला व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी मिळाली.
दरम्यान, व्हाईट हाऊसमध्ये आयोजित या सोहळ्यात उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन सहभागी होऊ शकल्या नाहीत. राष्ट्रपती बायडेन म्हणाले, फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना येथे यायचे होते मात्र त्या विस्कॉन्सिन दौऱ्यावर आहेत. तसेच कमला हॅरिसही कँपेन करत आहे. तुम्हाला माहीत आहेच की मी अनेक कारणांमुळे कमलाला आपले सहकारी म्हणून निवडले आहे. त्या स्मार्ट आहेत आणि त्या विश्वासार्ह आहेत.
बायडेन पुढे म्हणाले, दक्षिण-आशियाई अमेरिकन समूहाने अमेरिकी जीवनाचा प्रत्येक भाग समृद्ध केला आहे. हा जगात सर्वात वेगवान वाढणारा समूह आहे. आता दिवाळी व्हाईट हाऊसमध्ये गर्वाने साजरी केली जाते.
Tune in as I deliver remarks at a White House celebration of Diwali. https://t.co/72AJ9Fw0lO
— President Biden (@POTUS) October 28, 2024
दिवाळी साजरी करण्याची परंपरा
२००३मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती. दरम्यान, त्यांनी कधीही खाजगीपणे दिवाळी सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला नाही. मात्र २००९मध्ये बराक ओबामा यांनी राष्ट्रपती बनल्यानंतर व्हाईट हाऊसमधील दिवाळी पार्टीत भाग घेतला होता. त्यांनी दिवा पेटवत दिवाळी साजरी केली होती. यानंतर २०१७मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती बनल्यानंतर ही परंपरा कायम राखली होती. मात्र २०२२मध्ये राष्ट्रपती जो बायडेन यांनी फर्स्ट लेडी जिल बायडेनसह मिळून व्हाईट हाऊसमधील सर्वात मोठी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. यावेळी २००हून अधिक पाहुणे आमंत्रित करण्यात आले होते.