मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला बोलावले आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात निवडण्यात आले होते.
मात्र आता न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या कसोटीसाठी त्याला सामील करण्यात आले आहे. हर्षितला या मालिकेच्या पहिल्या कसोटीत ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले होते. त्यानंतर रिलीज करण्यात आले होते. यानंतर हर्षितने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी खेळताना आसामविरुद्ध पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. सोबतच अर्धशतकही ठोकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार हर्षित मुंबई कसोटीत पदार्पण करू शकतो. भारतीय संघाने याच पद्धतीने दुसऱ्या कसोटीसाठी ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला बोलावले होते. हर्षितला आयपीएल २०२४मधील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय संघात निवडण्यात आले. त्याआधी तो झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-२० संघासोबत गेला होता. श्रीलंका दौऱ्यावर तो वनडे संघाचा भाग होता.
नुकतेच बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेतही त्याची निवड झाली होती. मात्र अद्याप त्याने पदार्पण केले नव्हते. आता असे वाटत आहे की कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून खाते खोलेल. भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप आधीपासूनच आहेत. तिसऱ्या कसोटीत बुमराहसोबत दुसरा वेगवान गोलंदाज हर्षितला उतरवले जाऊ शकते.
भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड २-० ने आघाडीवर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरासून वानखेडेवर खेळवला जाणार आहे.