नवी दिल्ली : देशातील जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली. देशातील ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठांना नरेंद्र मोदी यांनी दिवाळीची भेट दिली. मोदी यांनी आयुष्मान योजनाचा नवीन टप्पा आयुष्मान भारत “निरामयम” योजना सुरु केली. दिल्लीमधील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) मध्ये आयोजित कार्यक्रमात १२ हजार ८५० कोटी रुपयांची ही योजना लागू केली. आता ७० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणारे सर्व वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्वांचा आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत अंतर्गत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहे. पाच लाखांपर्यंतच्या विमा योजनेचा लाभ दरवर्षी मिळणार आहे.
काय आहे ही योजना
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) या योजनेत ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी आहे. उत्पन्नाची त्यासाठी कोणतीही अट नाही. या योजनेचा लाभ कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्तीला मिळणार आहे.
तसेच जे परिवार या योजनेचा आधीपासून लाभ घेत आहे, त्या परिवारातील वृद्ध सदस्यांसाठी वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र उपचार उपलब्ध असणार आहेत. त्याचा फायदा देशातील सुमारे ४.५ कोटी कुटुंबांतील ६ कोटींहून अधिक वृद्धांना होणार आहे. या योजनेत आत्तापर्यंत केवळ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचा समावेश होता. मात्र, या योजनेत वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही.
असा मिळणार योजनेचा लाभ
वृद्ध व्यक्तींना या योजनेत आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे. ज्या कुटुंबाला आयुष्यमान योजना अजून लागू झालेली नाही त्यांना स्पेशल कार्ड २९ ऑक्टोंबरपासून मिळणार आहे. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ज्येष्ठ सदस्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान कार्ड दिले. आयुष्मान कार्ड बीआयएस पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ किंवा आयुष्मान ॲपद्वारे मिळेल. त्यासाठी वृद्धांना त्यांचं आधार कार्ड आणि केवायसी देखील अपडेट करावे लागेल. ज्या वृद्धांकडे खाजगी आरोग्य विमा असेल त्यांना खाजगी आणि आयुष्मान भारत योजना विमा यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.