गुजरातमधला सी-२९५ विमाननिर्मिती प्रकल्प ऐतिहासिक ठरणार!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी बडोद्यात टाटा-एअरबस एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन झाले. सी-२९५ या भारतीय हवाईदलाच्या या प्रकल्पामध्ये बहुद्देशीय समारिक मालवाहू विमानाची निर्मिती होणार आहे. भारतातील खासगी क्षेत्रासाठीही भारतीय हवाईदलाप्रमाणेच हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. भारतात प्रथमच एखाद्या विमानाची सी-२९५च्या निमित्ताने पूर्ण निर्मिती, देखभाल-दुरुस्ती, भविष्यात निर्यात या सगळ्या बाबी घडून येतील.
सी-२९५ विमानाचे वैशिष्ट्य
सामरिक महत्त्वाचे मालवाहू विमान सी-२९५ हे बहुद्देशीय आहे. या विमानाचा भारतासारख्या मोठ्या देशात आणि विविध भौगोलिक प्रदेशांतील लष्करी महत्त्वाच्या आस्थापनांदरम्यान सैनिक, सामग्री, रसद वाहतुकीसाठी उत्तम उपयोग होऊ शकतो. चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक व सामग्रीची ने-आण करण्यासाठी रस्त्यांपेक्षा हवाई वाहतूकच अधिक सोयीची ठरते. सध्या भारताच्या ताफ्यात या कामासाठी असलेली अॅव्हरो विमाने खूप जुनी झाली आहेत. १९६०च्या दशकामध्ये निर्मिलेल्या या विमानांची डागडुजी कारणंही सध्या शक्य होत नाही. सी-२९५ विमान सैनिक आणि सामग्री वाहतुकीबरोबरच वैद्यकीय आणीबाणी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण, हवाई मार्गाने आगी विझवणे आणि टेहेळणी अशा कामांसाठी वापरले जाणार आहे. आणि ते ३० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते. ७० सैनिकांना नऊ टन वजन किंवा वाहून नेऊ शकते. चटकन उड्डाण घेण्याबरोबरच कमी टणक, गवताळ किंवा भुसभुशीत धावपट्टीवरही उतरू शकतो.
भारतात किती विमानांची निर्मिती?
सी-२९५ ही विमाने एअरबसची कंपनी बनवत असे. भारतात आता लवकरच त्यांची निर्मिती एअरबसच्या सहकार्याने टाटा समूहाकडून होणार आहे. भारताने असा ५६ विमानांची मागणी नोंदवली. त्यांतील १६ स्पेनमधील सेव्हिया इथे बनवली जातील. उर्वरित भारतात ४० विमानांची निर्मिती होईल.
हा प्रकल्प ऐतिहासिक का?
भारतात विमानांची निर्मिती अत्यंत गुंतागुंतीच्या तंत्रज्ञान प्रकाराची मुहूर्तमेढ या निमित्ताने रोवली जात आहे. जगात फारच थोड्या देशांना स्वबळावर संपूर्ण विमाने बनवता येतात. ‘संपूर्ण’ अशी संकल्पना महत्त्वाची, कारण भारतात एरवी काही लढाऊ विमानांची जुळणी केली जाते. मात्र ती संपूर्ण निर्मिती नव्हे. तसेच या विमानांची देखभाल-दुरुस्ती आणि भविष्यात निर्यात होण्याचीही शक्यता आहे. भारताचे अशा रीतीने विमाननिर्मिती आणि विमान निर्यातीच्या महत्त्वाच्या क्षेत्रात पदार्पण होईल.