Monday, May 12, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Maharashtra Election : जागावाटपामध्ये महायुतीत भाजपा तर महाआघाडीत काँग्रेस ठरला मोठा भाऊ

Maharashtra Election : जागावाटपामध्ये महायुतीत भाजपा तर महाआघाडीत काँग्रेस ठरला मोठा भाऊ

काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होण्याचे संकेत



मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात जागावाटपाच्या चर्चेच्या गुऱ्हाळातून जे निष्पन्न झाले नाही, ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. महायुतीतील जागावाटपाची स्थिती आता कागदोपत्रीच मतदारसंघनिहाय स्पष्ट झाले आहे. भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.


दुसरीकडे महाविकास आघाडीचेही जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर दोन-दोन उमेदवार दिले आहेत.


विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ एवढे प्रदीर्घ चालले होते की शेवटचा दिवसही या याद्या प्रसिद्ध करण्याचाच होता. तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल, याची सोय करण्यात आली होती. परंतू, यामुळे पाच ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या एबी फॉर्मवर अर्ज भरले आहेत. याचे चित्र आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.


महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. पाच जागांवर तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार असलेले मतदारसंघ हे मिरज, सांगोला, पंढरपूर, परांडा, दिग्रस हे आहेत. आता या जागांवर कोण माघार घेते किंवा मैत्रिपूर्ण लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

Comments
Add Comment