मुंबई : मनसेने वांद्रे पूर्व विधानसभेतून आपला उमेदवार जाहीर केला असून, या उमेदवारामुळे महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचे बोललं जातंय.
माजी आमदार आणि भाजपाच्या मुंबई उपाध्यक्ष तृप्ती सावंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृप्ती सावंत यांना एबी फॉर्म दिला. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहेत.
महाविकास आघाडीतर्फे वरुण सरदेसाई तर महायुतीतर्फे झिशान सिद्दिकी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे मनसेकडून तृप्ती सावंत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने इथे तिहेरी लढत होणार आहे.
भाजपामधून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या तृप्ती सावंत या माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी असून, त्या २०१९मध्ये देखील विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उतरल्या होत्या. तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला होता. तर काँग्रेसला त्याचा फायदा झाला आणि या जागेवरून झिशान सिद्धिकी निवडून आले होते. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व येथे २०१५ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीत त्याचा फटका कोणाला बसतो, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.