किमान दहा लोक जखमी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, या घटनेवर आता राजकारण सुरू झाले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी वाहतूक ओव्हरफ्लो होती आणि त्यात दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यातच मुंबईच्या अति बंदोबस्त असलेल्या वांद्रे टर्मिनस येथे रविवारी चेंगराचेंगरीची भयंकर दुर्घटना घडली. त्यात किमान दहा जण किरकोळ जखमी झाले, तर दोन जण अतिगंभीर आहेत. इतक्या जीवघेण्या गर्दीतही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला आणि ते या दुर्घटनेचे शिकार झाले. घाटकोपरकडे जाणाऱ्या ट्रेनला पकडण्यासाठी भयंकर गर्दीत प्रवाशांनी प्रयत्न केला आणि या घटनेत भयंकर अफरातफरी माजली. या घटनेचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानकावर प्रचंड गोंधळ माजला होता आणि त्यातच ही दुर्घटना घडली. दिवाळी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या छट पूजा सणानिमित्त प्रवाशांची स्थानकात तुफान गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांनी आपल्या जागा आरक्षित केल्या नव्हत्या आणि त्यांनाच या गर्दीचा सर्वात जास्त फटका बसला. वांद्रे-घाटकोपर अयोध्या एक्स्प्रेस ही गाडी फलाट क्रमांक १ वरून वांद्रे टर्मिनसच्या यार्डमध्ये चालली होती. ही गाडी ५-१० वाजता येथून सुटणार होती. पण सणासुदीच्या दिवसांत प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये बसूनही प्रवास करण्याचा प्रयत्न करतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवासी पळत होते, काही जण जखमी झाले होते. त्यापैकी काही जण तर अति गंभीर होते. एका माणसाला रक्तस्त्राव होत असल्याचे व्हीडिओमधून दिसले. आता या घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे. एक तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्यात विरोधी पक्ष सरकारला या घटनेवरून घेरण्याची संधी सोडणार नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटले आहे की, वैष्णव हे सध्या बुलेट ट्रेनमध्ये गुंतले असल्याने मुंबईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालण्यास त्यांना सवड नाही. आदित्य ठाकरे यांनी वैष्णव यांच्या असे अपघात टाळण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पण ते विसरतात की, त्यांचे सरकार असताना कित्येक प्रकल्प तेव्हाच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवले होते. मेट्रो प्रकल्प असाच आता रेल्वे प्रशासनाने फलाटांच्या तिकिटांची विक्री करण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. पण त्यासाठी काही लोकांना चेंगराचेंगरीत जखमी व्हावे लागले. ही दुर्घटना घडल्यावर सीएसटी, दादर, कुर्ला आणि एल टीटी, कल्याण तसेच पुणे आणि नागपूर स्थानकांवर तिकीट विक्रीसंबंधी काही निर्देश लागू करण्यात आले आहेत. पण याचा अर्थ बैल गेला आणि झोपा केला असा होईल.
सणानिमित्त प्रचंड गर्दी आहे आणि रेल्वे प्रशासनाकडे इतक्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आता प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी तिकीट काऊंटरवर तात्पुरते बंधन लादण्यात आले आहे. याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही पण निदान मनुष्यहानी तरी होणार नाही. सेंट्रल रेल्वेकडून जारी केलेल्या एका पत्रकात माहिती देण्यात आली आहे की, फलाट तिकिटे ही सीएसएमटी, दादर, कुर्ला आणि एलटीटी आदी स्थानकांवर विक्री करण्यात येतील पण त्यांच्या संख्येवर काही निर्बंध घालण्यात येतील. हे निर्बंध गर्दीचे व्यवस्थापन करण्यास सहाय्यभूत होतील यात काही शंका नाही. वास्तविक रेल्वे प्रशासनाने ही उपाययोजना अगोदरच करायला हवी होती. पण रेल्वने तसे केले नाही ही वस्तुस्थिती आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा अर्थ असा होतो की, हवशे-गवशे आणि नवशांना तिकीट आता विक्री केली जाणार नाही. आता हे कसे ठरवणार हा प्रश्नच आहे. मात्र वृद्ध व्यक्ती आणि आजारी माणसाना यातून सुट्टी देण्यात आली आहे. याचे एक कारण असे सांगण्यात येते की, अनेक जण फलाट तिकीट काढून रेल्वे डब्यांतील आपल्या आसनापर्यंत पोहोचवण्यासाठी येतात. त्यांची काहीच गरज नसते. पण गर्दीचे योग्य नियोजन आणि सुसूत्रता राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत फलाट तिकिटाच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दिवाळी आणि छट पूजेनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी होत आहे. छट पूजेनिमित्त बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होते.
वास्तविक आता रेल्वेची व्यवस्था उत्तम झाली आहे. अपघातांची संख्या रोडावली आहे. पूर्वीसारखे अपघात होत नाहीत. पण रेल्वे प्रशासनाची काही मजबुरी आहे आणि त्यात समावेश आहे तो अपुऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा. या पूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. ज्यांनी अनेक जणांचा बळी घेतला आहे आणि त्यात एलफिन्स्टन रोज स्थानकावरील चेंगराचेंगरीचा समावेश आहे. यापेक्षाही अनेक घटना आहेत. याची काही खास कारणे आहेत ती म्हणजे एक तर प्रचंड गर्दी आहे आणि दुसरे म्हणजे स्थानके अत्यंत अरुंद जागेत आहेत. फूट ओव्हर ब्रिजेसवर एका वेळेस प्रचंड संख्य़ेने लोक सामील होतात. रेल्वे प्रशासनाने यावर काही उपाययोजना शोधली पाहिजे. यात हवामानाच्या स्थितीचा अनेकदा परिणाम होतो. रेल्वेने यासाठी काही तरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. सर्वसामान्य मुंबईकर गर्दीचे व्यवस्थापन नीटरीत्या होण्यासाठी रेल्वेकडून वाट पाहत आहेत. चेंगराचेंगरीच्या दुर्घटना यासाठी घडतात कारण गर्दी त्यांच्या क्षमतेच्या बाहेर जाते आणि ती एकाच दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागते. कोणतेही प्रशासन यासाठी हतबल ठरते पण विरोधकांना राजकारण करण्याशिवाय दुसरा इलाज नसतो. कारण त्यांना गर्दीला उत्तर द्यायचे असते. पण रेल्वे प्रशासन असो अथवा अन्य कोणतीही यंत्रणा असो. या परिस्थितीत ती हतबलच ठरते. वांद्रे टर्मिनस येथील दुर्घटना ही याचेच
उदाहरण आहे.