उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे, हे माझे प्राधान्य नाही, तर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणे प्राधान्य आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच महाविकास आघाडीला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हान देखील केले. तसेच, भाजपच्या लोकसभेतील खराब कामगिरीचे कारणही सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेवेळी एक फेक नरेटिव्ह चालला गेला. लोकसभेत महाविकास आघाडीला ४३.९ टक्के मते मिळाली, तर महायुतीला ४३.६ टक्के मते मिळाली. पॉइंट तीन टक्क्यांनी ते आमच्या पुढे होते. पण जागांमध्ये मोठी उलटफेर झाली. त्यात दोन कारणे आहेत. संविधान बदलले जाईल, आरक्षण जाईल असे सांगितले जात होते. आम्ही ते काऊंटर करण्यात कमी पडलो. तसेच, महाराष्ट्रात आम्हाला आमचा अतिआत्मविश्वास नडला. महाराष्ट्रात व्होट जिहादमुळे आमचे नुकसान झाले. धार्मिक स्थळांना आमच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, पण व्होट जिहादच्या माध्यमातून जे काही झाले, ते आता विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. आता महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन होईल. आता परिस्थिती बदलली आहे. संविधान बदलणार नाही, आरक्षणाला धोका नाही हे लोकांना माहीत आहे. आपल्या हातात संविधान घेऊन जाणारे राहुल गांधी आरक्षण संपवले पाहिजे, असे परदेशात जाऊन सांगतात. आरक्षण संपवण्याचा फॉर्म्युला सांगतात आणि नाना पटोले त्यांचे समर्थन करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.