लढणार की, हटणार?
मुंबई: मुंबईत माहीम विधानसभेत तिहेरी लढत होणार असल्याचं समोर आलं होतं. माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Amit Thackeray) तर, शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जातय.
कोण लढणार , कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार ?
माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. पण, असं झाल्यास खरा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातलं आव्हान कमी करण्यासाठी महायुती आणि मनसेकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री दीपक केसरकर एक खास निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आली. तर, दुसरीकडे आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिलं पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.