पालघर :- पश्चिम रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ इंजिन फेल झाल्याने रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, सध्या रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे केळवे रोडजवळ इंजिन अचानक फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील पालघर रेल्वे स्थानकावरचं थांबून राहिली आहे. तसेच, गुजरातवरून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांची तत्काळ कारवाई
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने केळवे रोड परिसरात दाखल झाले आहेत. मालगाडीच्या फेल झालेल्या इंजिनची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून दुरुस्ती प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यामुळे लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या या इंजिन फेलमुळे काही काळासाठी त्रास सहन करावा लागला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.